पुणे : जहाजांवर सुधारत असलेली कनेक्टिव्हिटी,सुरक्षा उपायांमध्ये सुधारणा,भारतातील उत्तम शालेय शिक्षण रचना,शिपिंग उद्योगासंबंधी प्रशिक्षण संस्थांची उपलब्धता,आंतरराष्ट्रीय नियम आणि अनुपालनाबाबत असलेले समज आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जहाजांवर सुधारत असलेले जीवनमान यामुळे जागतिक शिपिंग उद्योगात भारतीय नाविक व्यावसायिकांचा सहभाग वाढत आहे.
दरवर्षी 25 जून रोजी द डे ऑफ सीफेरर्स या दिवसाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय व्यापार आणि जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये नाविक व्यावसायिकांचे योगदान याबाबत जागरूकता केली जाते. यावर्षी या दिनाची संकल्पना ही सेफ्टी फर्स्ट असून जहाजांवरील सुरक्षा आणि त्याचबरोबर सागरी पर्यावरणाचे रक्षण प्रतिबिंबित करते.
सुरक्षेव्यतिरिक्त इंटरनॅशनल मरिटाईम ऑर्गनायझेशन (आयएमओ) चा भर महिला व्यावसायिकांना या क्षेत्रात येण्यास प्रोत्साहित करणे यावर आहे.सध्या जगभरात एकूण नाविक व्यावसायिकांपैकी महिलांची संख्या ही केवळ 2 टक्के आहे.मात्र भारतात असलेल्या अभ्यासक्रमांची उपलब्धता,शिष्यवृत्त्या आणि डीजी शिपिंग कडून मिळत असलेले प्रोत्साहन यामुळे महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.क्रू सदस्यांपासून ते ऑफिसर्स आणि अभियंत्यांपर्यंत भारतीय महिला या क्षेत्रात आपला ठसा उमटवित आहेत.यामुळे जागतिक शिपिंग उद्योगात भारताची भूमिका अधिक वाढणार आहे.
कंपनी ऑफ मास्टर मरिनर्स,इन्स्टिट्युट ऑफ मरिन इंजिनिरर्स इंडिया आणि इंडियन मरिटाईम फाऊंडेशन या शिपिंग उद्योगाशी निगडीत संस्थांनी पुण्यात या दिनानिमित्त 30 जून रोजी पीवायसी जिमखाना येथे चर्चासत्र आणि सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
इन्स्टिट्युट ऑफ मरिन इंजिनिरर्स इंडिया,पुणे चे अध्यक्ष व माजी मुख्य अभियंते संजीव ओगले म्हणाले की,पुणे आणि नाविक व्यावसायिक समुदाय यांचे आधीपासूनच भक्कम नाते आहे.पुण्यात या उद्योगाशी निगडीत तीन संघटना,चार प्रशिक्षण संस्थांसह 5000 नाविक व्यावसायिक आहेत.त्यापैकी सध्या मालवाहू आणि प्रवासी जहाजांवर 1000 व्यावसायिक सक्रीय आहेत.मुंबई आणि गोवा तुलनेने जवळ असल्याकारणाने आणि नव्वदच्या दशकापासून शहरांना जोडणारे रस्ते आणि पायाभूत सुविधांमध्ये झालेला सुधार यामुळे पुण्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर नाविक व्यावसायिक स्थायिक झाले आहेत.नवीन पिढी या क्षेत्राकडे आकर्षित व्हावी आणि त्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी गुलटेकडी येथे आम्ही विशेष केंद्र स्थापित केले आहे.
द कंपनी ऑफ मास्टर मरिनर्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष कॅप्टन श्रीरंग गोखले म्हणाले की,जागतिक पातळीवर नाविक व्यावसायिकांच्या एकूण संख्येत भारतीयांचा वाटा हा 10 टक्के असून 2030 पर्यंत 20 टक्क्यांपर्यंत पोहचण्याची अपेक्षा आहे.इंग्रजी भाषेतील असलेले कौशल्य,तंत्रज्ञान कौशल्य असलेले मनुष्यबळ,भारतातील उत्तम शालेय शिक्षण रचना आणि जहाजांवरील जीवनमानाची सुधारत असलेली गुणवत्ता यामुळे हे सगळे शक्य होत आहे.नाविक व्यावसायिकांच्या अनुभवामुळे आंतरराष्ट्रीय नियम आणि अनुपालनांची देखील आपल्याला चांगली जाण आहे.
इंडियन मरिटाईम फाऊंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन आनंद दीक्षित म्हणाले की,सागरी प्रवासात काही वेळा खराब हवामानाचे आव्हान,त्यानंतर फोफावलेली चाचेगिरी आणि आता मध्यपूर्व देशांमध्ये चाललेले युध्द अशी अनेक आव्हाने नाविक व्यावसायिकांसमोर आहेत.मात्र आंतरराष्ट्रीय नौदलांकडून वाढता पहारा व सुरक्षा,त्यात भारतीय नौदलाची सक्रिय भूमिका यामुळे जोखीम कमी होत आहे.वस्तुस्थिती ही आहे की,जागतिक व्यवसाय आणि अर्थव्यवस्था ही शिपिंग उद्योगावर अवलंबून असून त्याला कोणताही पर्याय आहे.भारतीय नाविक व्यावसायिकांची भूमिका यापुढे आणखी वाढत जाईल.
हे सर्व होत असताना भारतीय शिपिंग उद्योगाला चालना देण्याची गरज आहे,असे मत इंडियन कोस्टल ऑपरेटर्स या संघटनेचे माजी अध्यक्ष आणि कंपनी ऑफ मास्टर मरिनर्स ऑफ इंडियाचे माजी सदस्य कॅप्टन सुधीर सुभेदार यांनी व्यक्त केले.सध्या भारताकडे सुमारे केवळ 1000 व्यापारी जहाजे आहेत व भारतीय व आतंरराष्ट्रीय गरजांची पूर्तता करण्यासाठी याची संख्या निदान पाचपट होणे आवश्यक आहे.कंटेनर,औषधे,एक्स्पेंसिव्ह कोल्ड कार्गो,तयार माल व रेल्वे बोगींसारखे अवजड उपकरणांची वाहतूक देखील देशांतर्गत सागरी मार्गाने केली जाऊ शकते,जी किफायतशीर आणि पर्यावरणपूरक ठरेल.शिपिंग उद्योगाला चालना देण्याची गरज असून कर सवलती,वित्तीय प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
नवीन पिढीमध्ये तंत्रज्ञान आणि कौशल्य आत्मसात करण्याची वृत्ती ही चांगली गोष्ट आहे,पण याचबरोबर यशस्वी नाविक होण्यासाठी वास्तविक अनुभव (इंटर्नशिप) घेऊन स्वत:ला सक्षम करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे,असे मत या सर्व तज्ञांनी व्यक्त केले.