पुणे :- देशातील प्रत्येक कामगाराला किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षेची हमी देणारे सोशल सिक्युरिटी व वेज लेबर कोड महाराष्ट्रात लागू करा अशी मागणी पुणे येथे संपन्न झालेल्या भारतीय मजदूर संघाच्या २३ व्या त्रैवार्षिक अधिवेशनात करण्यात आली. त्याशिवाय नवीन पेन्शन स्कीम रद्द करा , EPF पेन्शन ५००० करा , कंत्राटी पद्धत निम योजना रद्द करा यासह विविध मंगण्यांचे १० ठराव मंजूर करण्यात आले.
भारतीय मजदूर संघाचे २३ वे त्रैवार्षिक अधिवेशन पुणे येथे आभासी पद्धतीने संपन्न झाले. अधिवेशनात महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून ५६० निवडक प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. या दोन दिवसीय अधिवेशनात महिलांच्या प्रश्नांनावर विशेष सत्र घेण्यात आले त्यामध्ये अखिल भारतीय सचिव श्रीमती नीलिमा चिमोटे यांनी मार्गदर्शन केले. या असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या समस्या या विषयावर एक विशेष चर्चासत्र घेण्यात आले यामध्ये श्री. जयंत देशपांडे,अखिल भारतीय शहरी असंघटित प्रभारी व श्री. अण्णा धुमाळ अखिल भारतीय औद्योगिक क्षेत्र प्रभारी यांनी मार्गदर्शन केले, श्री मोहन येणूरे यांनी या सत्राचा समरोप केला. विविध ठरावांचे सत्र श्री अनिल ढुमणे यांनी घेतले त्यात बापू दडस , मोहन येणूरे , अर्जुन चव्हाण , सचिन मेंगाळे यांनी विविध ठराव मांडले सत्राचा समारोप श्री सुभाष सावजी यांनी केला.
अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी भा. म. संघाचे क्षेत्रीय संघटन मंत्री मा. श्री. सी. व्ही. राजेश यांनी कामगार क्षेत्रासमोरची आव्हाने आगामी काळात तीव्र होणार असून, यापुढे संघटित कामगार क्षेत्रा सोबतच असंघटित क्षेत्रात भारतीय मजदूर संघाने लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय केला आहे असे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री विजयराव मोगल यांनी भूषवले , प्रास्ताविक श्री रवींद्र देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री मोहन येणूरे यांनी केले . वंदेमातरम नंतर कार्यक्रम संपन्न झाला.
नवीन पदाधिकारी
पुढील ३ वर्षांसाठी नवीन पदाधिकारी निवड अधिवेशनात करण्यात आली असून अॅड श्री. अनिल ढुमणे मुंबई अध्यक्ष, श्री. मोहन येणुरे , ठाणे यांची सरचिटणीस, श्री. किरण मिलगिर ठाणे कोषाध्यक्ष व प्रदेश संघटन मंत्री म्हणून श्री. श्रीपाद कुटासकर, औरंगाबाद यांचे सह अन्य ११ पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.