मराठा आरक्षण: उद्रेक झाला तर राज्यकर्ते जबाबदार असतील- उदयनराजे

राजकारण
Spread the love

पुणे- कधीही आपण जात पाहिलेली नाही, पण लहानपणाचे मित्रदेखील आता अंतर ठेवून बोलतात. ही फळी कोण निर्माण करत आहे, तर ते राज्यकर्ते करत आहे. याच्याशी समाजाचा काही संबंध नाही. आरक्षण द्यायची इच्छाच नसून यांना फक्त राजकारण करायचे आहे. आरक्षणाच्या मुद्यावरुन व्यक्तीकेंद्रीत राजकारण सुरु असून उद्रेक झाला तर राज्यकर्ते जबाबदार असतील. त्यावेळी आम्हीदेखील थांबवू शकणार नाही. आमच्यावरही हल्ला करायला थांबणार नाहीत. अशी वेळ येऊ देऊ नका, पण ही वेळ येणार असल्याची भीती उदयनराजेंनी व्यक्त केली आहे.

छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणावरुन आंदोलनाची हाक दिल्यानंतर आज उदयनराजेंची भेट घेतली. दोन्ही राजेंमध्ये मराठा आऱक्षणाच्या मुद्यावर पुण्यात चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही राजेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. दोघांमध्ये बहुतांश मुद्द्यावर एकमत झाल्याचे संभीजीराजे यांनी यावेळी सांगितले. तसेच उद्या आमच्यावरही हल्ला होईल अशी वेळ येऊ शकते अशी भीती उदयनराजे यांनी यावेळी व्यक्त केली.

आम्ही दोघे एकाच घराण्यातील आहोत. मी संभाजीराजे यांनी मांडलेल्या विचारांशी सहमत असल्याचे उदयनराजे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान यावेळी देशाची पुन्हा फाळणी करायची की नाही याचा विचारा करावा असे सांगताना आजचे राज्यकर्ते यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्याबद्दल मी बोलत असून केंद्राला पण लागू होते. प्रत्येक राज्याला लागू होते असल्याचेही ते म्हणाले. अध्यादेश काढून मराठ्यांना आरक्षण द्या अशी मागणी, यावेळी त्यांनी केली.

मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा आणि श्वेतपत्रिका काढा

पक्ष-बिक्ष इथे आणू नका, मी जे बोलतोय ते सगळ्या पक्षांना लागू आहे. हा समाजाचा प्रश्न आहे. आधी राज्याचं बघा, केंद्राचं मी बघतो, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकार आणि मराठा समाजातील नेत्यांना इशारा दिला. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा, श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी उदयनराजे यांनी यावेळी केली.

उदयनराजे म्हणाले कि, “मराठा आऱक्षण ही राज्याची जबाबदारी आहे. जर हे सगळे आमदार, खासदार एवढे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असतील तर नेमकी समस्या काय आहे. उद्धव ठाकरे, अजित पवार सोडून द्या सगळे…मी सगळ्यांबद्दलच विचारतोय. विशेष अधिवेशन बोलवा ना तुम्ही…लाईव्ह प्रक्षेपण करा. पण हे सभागृहात गेल्यावर एक बोलतात आणि बाहेर आल्यावर दुसरं बोलतात,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.

केंद्राच्या भूमिकेसंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “दम असेल तर अधिवेशन बोलवावं. आधीने राज्याने धाडस असेल तर अधिवेशन घेऊन दाखवावं नंतर मी केंद्राचं पाहतो,” असंही ते म्हणाले आहेत. “अधिवेशन बोलवून गायकवाड कमिशनच्या रिपोर्टवर चर्चा करावी. आता जस्टीस भोसले यांचा रिपोर्ट आला आहे. थप्पी गोळा करुन काय रद्दीत विकून त्यावर राज्य चालवणार का? काय फालतुगिरी सुरु आहे,” असा संताप व्यक्त करताना उदयनराजेंनी यांना आधी अधिवेशन घेऊ द्या, मग रुपरेषा ठरवतो. मग एकेकाला कसं गाठायचं ते मी बघतो असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

ते पुढे म्हणाले, पाच बोटं एकसारखे नसतात, सर्वांचे विचार वेगवेगळे असतात. माझे प्रिन्सिपल वेगळे आहेत, तुमचे वेगळे आहेत. मी कायदे बियदे मानत नाहीत, सुप्रीम कोर्टात कुणी गायकवाड अहवाल वाचलाच नाही, हे माझं ठाम मत आहे. गरिबांना वंचितांना शिक्षणापासून का दूर ठेवलं जात आहे. पक्ष-बिक्ष इथे आणू नका. मी जे बोलतोय ते सगळ्या पक्षांना लागू आहे. हा प्रश्न समाजाचा आहे. सामाजिक व्यवस्थेत फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे.

समाजात तेढ निर्माण करू नका

मंडल आयोगाने ओबोसींना आरक्षण दिले. त्यावेळी दिल्लीतच होतो. तेव्हा दिल्लीत आरक्षण विरोधक आणि समर्थकांची रस्त्यावरच भोसकाभोसकी सुरु होती. मी दिल्लीत होतो ते मला आठवतं आहे असे सांगून तुम्ही इशू बेस पॉलिटिक्स करा. समाजात तेढ निर्माण करू नका. कोर्ट कचेऱ्यावर मला अजिबात आता विश्वास नाही, काय घडणार हे मला माहिती आहे, असं ते म्हणाले.

किती काळ संभ्रमावस्थेत ठेवणार

माझा पाठिंबा संभाजीराजेंना आहे. मराठ्यांना आरक्षण हे एकच ध्येय आहे. राज्यकर्त्यांना फार मुभा दिली. निवडून आलं म्हणजे आपलं सगळं असं समजू नका. लोकशाहीचे हे राजे आहेत, त्यांना जाब विचारला पाहिजे. माझं ठाम मत आहे, आडवा आणि गाडा, जाब विचारा. सुरुवात माझ्यापासून करा. आमच्या वाड्यावर येऊन विचारा… माझ्याप्रमाणे सर्वांना विचारा. खरं खोटं करा. किती काळ संभ्रमावस्थेत ठेवणार, असा सवालही त्यांनी केला.

दिशाभूल करणे आमच्या रक्तात नाही -संभाजीराजे

दोन्ही छत्रपती घराण्यांना फार मोठा सामाजिक वारसा आहे. आम्ही समाजाला नेहमी एक वेगळी दिशा दिली आहे. दिशाभूल करणे आमच्या रक्तात नाही. म्हणून उदयनराजेंची आपण भेट घेतली. आमची सविस्तर चर्चा झाली असून बहुतांश अनेक विषयांवर आमचे एकमत आहे. आमच्यात अजिबात दुमत नाही. पूर्वीपासून आम्ही एकमताने काम करत आल्याचे संभाजीराजेंनी यावेळी सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 338 बी नुसार आयोग स्थापन करावं लागेल. मराठा समाज हा सामाजिक मागास असल्याचं सिद्ध करावं लागेल. हा अहवाल राज्यपालांना पाठवावा लागेल. राज्यपाल राष्ट्रपतींना पाठवतील, मग तो केंद्रीय मागास आयोगाकडे जाईल. त्यांना वाटल्यास ते आरक्षण देतील. आरक्षण मिळण्यासाठीचे मी दोन चार पर्याय दिले आहेत. त्यामुळे कोणत्या मार्गाने जायचं हे राज्यकर्त्यानेच ठरवावं, असं संभाजी छत्रपती म्हणाले.

मूक आंदोलन होणारच

येत्या 16 जून रोजी कोल्हापूरमध्ये मूक आंदोलन होणार आहे. आम्हाला 36 जिल्ह्यात जायचं नाही. आता त्यावर तुम्हीच मार्ग काढा. आम्ही सहा मागण्या दिल्या आहेत. त्या मान्य करा. तुमचं स्वागत करू, असं सांगतानाच मराठा आरक्षणावर समाज बोलला, आम्ही बोललो. आता लोक प्रतिनिधींनी बोलायला हवं, असं ते म्हणाले. अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करा, अशी मागणीही त्यांनी केली.

उदयनराजेंना बऱ्याच वर्षानंतर भेटलो. एरव्हीही भेटत असतो. पण सातारा आणि कोल्हापूर हे दोन घराणे एकत्र आले. एका मोठ्या विषयावर आम्ही एकत्र आलो याचा आम्हाला आनंद आहे, असं ते म्हणाले.

शाहू महाराज अजित पवार यांच्या भेटीबाबत मला कल्पना नाही

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीमंत शाहू महाराजांची कोल्हापुरात जाऊन भेट घेतली. त्याबाबतही त्यांना विचारण्यात आलं. अजित पवार पॅलेसमध्ये येणार याची मला वैयक्तिक माहिती नव्हती. अजितदादांचा मला फोन आला नव्हता. मला पॅलेसमधून तसं कळलं. शाहू महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी ते गेले असतील. त्यांच्या भेटीतील चर्चेबाबत मला काहीही कल्पना नाही, असं त्यांनी सांगितलं.

म्हणून मोदींनी भेट टाळली असेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत मी जेव्हा जेव्हा इच्छा व्यक्त केली तेव्हा एक ते दीड दिवसांमध्ये मला भेट दिली. फक्त मराठा आरक्षणाबाबत तांत्रिक बाबींमुळे कदाचित त्यांची अडचण झाली असेल. त्यामुळे त्यांनी यावेळी भेट टाळली असावी, असे संभाजीराजे यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *