पुणे – आपल्या देशाला कला आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात देश सर्वच क्षेत्रात प्रगती करीत असताना, हा वारसा जतन आणि संवर्धन करण्याची आवश्यकता असल्याचे मत डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणे आणि त्या माध्यमातून भारताचा समृद्ध वारसा पुढील पीढीकडे पोहोचविण्याच्या उद्देशाने गेल्या दहा वर्षांपासून बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) ‘हेरिटेज कलेक्टिव्ह’ विभागाच्या वतीने सुरू असलेल्या ‘अस्तित्व’ या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. कुंटे बोलत होते.
संस्थेचे कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, बीएमसीसीचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, डॉ. राजश्री गोखले. डॉ. अनघा काळे, वृषाली महाजन, निकिता शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
ऑनलाइन पद्धतीने झालेल्या या स्पर्धेत १६ ते २५ वयोगटातील ११८६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये ११०७ राष्ट्रीय आणि ७९ आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा समावेश होता. काव्यकला, पनाश रेखाटन, रंगानुभव, कॉमिडल्स,ङ्गलाकृती, क्लिकथॉन, कॉमिक वर्ल्ड, दृष्टिकोन, मुखवटा, नृत्यालंकार, व्हेंचुरा, स्वरसाधना, वाद्यालंकार, क्वीझ आदी १५ प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.