बाह्य आणि अंतरविश्वातील संघर्षाचा हुंकार म्हणजे कविता- डॉ. रावसाहेब कसबे


पुणेः- मनुष्याचे बाह्य आणि अंतर असे दोन विश्व असतात. यात कधी संवाद तर कधी संघर्ष असतो. कवी कविता लिहितो म्हणजे काय करतो तर, जगण्यातले दुःख, आनंद आणि संघर्ष या तीन त्रिज्यांमधून आलेल्या आतल्या आवाजाचा कधी संघर्ष शब्दबद्ध करतो, तर कधी त्याच्याशी संवाद साधतो. बाह्य आणि अंतरविश्वातील संघर्षाचा हुंकार म्हणजे कविता. अनुभवाची कलासक्त अभिव्यक्ती म्हणजे कविता होय, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले.

शांती पब्लिकेशन्स तर्फे प्रकाशित उद्धव कानडे लिखित ‘केशरमाती कविता आणि समीक्षा’ या समीक्षाग्रंथाचे प्रकाशन डाॅ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध वक्ते आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी  होते. यावेळी व्यासपीठावर लेखक-कवी उद्धव कानडे, महाराष्ट्र कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर, आडकर फाऊंडेशनचे अध्यक्ष अॅड.प्रमोद आडकर, शांती पब्लिकेशन्सचे प्रकाशक रघुनाथ उकरंडे आदी मान्यवर उपस्थित होते.                           

अधिक वाचा  पंतप्रधान मोदींसाठी मोहोळांच्या संकल्पकनेतून साकारली खास ‘दिग्विजय पगडी’

प्रा. विश्र्वास वसेकर आणि डॉ. संभाजी मलघे यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे.

यावेळी बोलताना डॉ. रावसाहेब कसबे म्हणाले की,  कला हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असून कोणत्यातरी कलेशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जोडले गेल्याशिवाय मनुष्यत्वाचे वर्तुळ पूर्ण होत नाही. मनुष्य हा निसर्गातून आला आणि त्याच्यात जैविक क्रांती तसेच बोधक्रांती झाली. या क्रांतीव्दारे मनुष्याला त्याच्या अस्तित्वाचा बोध झाला. या उत्क्रांतीनंतर मनुष्याचा विकासाच्या दृष्टीने प्रवास सुरू झाला, परंतु हा प्रवास सुरू असताना, निसर्गातून उत्क्रांतीच्या दिशेने वाटचाल करीत असताना निसर्गातील कुठलातरी घटक आपण हरवून बसलो आहोत, याची खंत, याची बोचणी त्याच्या मनाला सतत टोचत असते. त्या हरवलेल्या गोष्टीचा शोध घेण्यासाठी मनुष्याने पुन्हा निसर्गात परतण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु तो यशस्वी ठरला नाही. बोधक्रांतीनंतर, उत्क्रांतवाद स्वीकारल्यानंतर उचललेले विकासाचे पाऊल मागे घेणे त्याला कठीण गेले आणि विकासाच्या दिशेने प्रवास करणे क्रमप्राप्त ठरले. माणूस सातत्याने स्वतःचे, निसर्गाचे आणि समाजाचे आकलन करीत आहे. माणूस होण्यासाठी ही महत्त्वाची प्रक्रीया आहे. परंतु, या समजून घेण्याच्या प्रक्रीयेमध्ये एकवेळ माणूस समाजाला आणि निसर्गाला फसवू शकेल, पण तो स्वतःला फसवू शकत नाही. त्यामुळेच माणूस हा अतिशय दुभंगलेला आहे.

अधिक वाचा  ज्ञानलालसा आणि जिज्ञासू वृत्ती क्षीण होत आहे- प्रा. मिलींद जोशी

 प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, कविता संग्रहाची समीक्षा होताना दिसत नाही. आजही समीक्षक ज्ञानेश्वर आणि मर्ढेकरांपर्यंत येऊन थांबलेले आहेत. समीक्षा व्यवहारांवर धुके साचलेले आहे. समीक्षेच्या केंद्रस्थानी कसदार साहित्य असणे अपेक्षित असताना आज तो लेखक, तो साहित्यिक, तो कवी कोणत्या विचारप्रवाहाचा, कोणत्या विचारधारेचा आहे, कोणत्या समुहातील आहे इथपर्यंत मराठी समीक्षेचे अधःपतन झाले आहे. साहित्य व्यवहार हा केवळ साहित्य व्यवहार का राहिला नाही, याचे आत्मपरिक्षण होणे गरजेचे आहे, याचा शोध घेणे आवश्यक आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आडकर फाऊंडेशनचे अध्यक्ष अॅड.प्रमोद आडकर यांनी केले. ‘केशरमाती कविता आणि समीक्षा’ या समीक्षाग्रंथाचे लेखक, कवी उद्धव कानडे यांनी लेखकीय मनोगत व्यक्त केले. तर शांती पब्लिकेशन्सचे प्रकाशक रघुनाथ उकरंडे यांनी प्रकाशकिय मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ कवी बंडा जोशी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून आभार मानले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love