पुणे-माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभेचे खासदार रंजन गोगोई यांनी भारताच्या न्यायव्यवस्थेच्या बाबतीत केलेल्या वादग्रस्त विधानावरून टीका होत असताना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही गोगोई यांचे विधान धक्कादायक आणि प्रत्येकाला चिंता वाटायला लावणारे आहे असे म्हटले आहे.
गोगोई यांनी एका वृत्त वाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली असून मला विचाराल तर मी कुठल्याही गोष्टीसाठी न्यायालयात मुळीच जाणार नाही, तिथे तुम्हाला न्याय मिळत नाही, असे विधान केले होते. माजी सरन्यायाधीश असे विधान करतात म्हटल्यावर सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या व गोगोई यांच्या या विधानावरुन टीकाही सुरू झाली होती.
आज शरद पवार एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले असताना त्यांना गोगोई यांच्या विधानाबाबत विचारले असता ते म्हणाले, गेल्या आठवड्यात आपल्या देशाची न्यायव्यवस्था उच्च असल्याचे माझ्या वाचनात आले होते. देशाच्या पंतप्रधानांनी न्यायाधीशांच्या बैठकीत हा उल्लेख केला होता. त्याबाबत आनंद झाला. परंतु, गोगोई यांनी न्यायव्यवस्थेबाबत केलेलं विधान मात्र, धक्कादायक आहे. त्यांनी त्यांच्या परीने सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे का हे मला ठावूक नाही, त्यांचे हे विधान प्रत्येकाला चिंता करायला लावणारे आहे.