पुणे-दहा वर्षाच्या अल्पवयीन दिव्यांग मुलीचे अपहरण करून तिला जबरदस्तीने दारू पाजून अपहरणकर्त्यांनी तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही धक्कादायक घटना काळेपडळ परिसरात शुक्रवारी (दि.२०) रात्री नऊ वाजता घडली.
याप्रकरणी एका ३२ वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राठोड नावाचा व्यक्तीच्या विरुद्ध, तसेच त्याच्या एका साथीदाराविरुद्ध अपहरण, विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचाराच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची १० वर्षीय मुलगी दिव्यांग असल्यामुळे तिला बोलता येत नाही. शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास ती घराजवळ असलेल्या कॉलनीत खेळत होती. यावेळी मोटारसायकलवरुन दोघे जण तेथे आले. त्यांनी तिला कशाचे तरी आमिष दाखवून मोटारसायकलवरुन जबरदस्तीने एका ठिकाणी पळवून नेले. तेथे मुलीच्या अज्ञान व दिव्यांगपणाचा फायदा उठवत राठोड व त्याच्या साथीदाराने दारू पाजून तिच्यासोबत अश्लील कृत्य करून विनयभंग केला. तसेच तिचे केस ओढून लैंगिक छळवणूक केल्याचेही फिऱ्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्याचे रात्री ९ वाजण्याच्या सुमारास लक्षात आल्यावर तिच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरु केली. तेव्हा रात्री साडेअकरा वाजता ती सापडली. राठोड यानेच मुलीला ती राहत असलेल्या परिसरात आणून सोडले होते. हा प्रकार काही नागरिकांनी पाहिला. मुलीचे नातेवाईक तिचा शोध घेत असताना नागरिकांनी मुलीला सोडणार्या व्यक्तीची माहिती दिली. त्यानुसार तिच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेत राठोड आणि त्याच्या साथीदाराच्या विरुद्ध फिर्याद दिली.
पिडीत मुलीचे अपहरण करून तिला पुन्हा ती राहत असलेल्या परिसरात राठोड याने सोडले. त्यावेळी तिच्या आई-वडिलांना नागरिकांनी याबाबत सांगितले. दरम्यान मुलीने आईला सांकेतिक भाषेत तिच्यासोबत घडलेल्या घृणास्पद प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर हा प्रकार उघड झाला.