मोदींपाठोपाठ अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर : हे आहे कारण..

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे– सहकार खात्याकडून लॉन्च करण्यात आलेल्या एका पोर्टलचं उद्घाटन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री  अमित शाह (Amit Shaha) यांच्या हस्ते आज (रविवार) करण्यात येणार आहे. अमित शाह यांच्याकडे केंद्रीय गृह आणि सहकार खातं आहे. त्यामुळे त्यांच्या हस्ते या पोर्टलचे उद्घाटन हे फक्त निमित्त असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्या पाठोपाठ  अमित शाह पुण्याच्या दौऱ्यावर येत असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

मल्टिस्टेट सहकारी पतसंस्थांच्या पोर्टलचं उद्घाटन केल्यानंत अमित शाह राज्यातील प्रमुख नेत्यांसोबत बैठकीत चर्चा करणार आहेत. सहकारमंत्री अमित शहा यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis), उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar), दिलीप वळसे पाटील (Dilip Valase Patil), स्थानिक आमदार महेश लांडगे(Mahesh Landage) आणि हर्षवर्धन पाटील (Harshavardhan Patil)उपस्थित राहणार आहेत.

गृहमंत्री अमित शहा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीबाबत रणनीती ठरवली जाणार आहे. त्यामुळं आता लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून महाराष्ट्रात मोर्चेबांधणीला सुरुवात झाल्याचं बोललं जात आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती, मावळ, शिरूर या तीनही लोकसभा मतदारसंघासाठी भाजप विशेष आग्रही आहे. शिंदेंचे शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी त्यासाठी भाजपला मदत करणार असून प्रसंगी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार हेसुध्दा कमळ चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जाते. भाजपकडून त्यासाठी चाचपणी सुरू आहे. मोदी आणि नंतर शाह यांच्या दौऱ्याला त्यामुळे महत्व आहे.

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे शहराचा दौरा केला होता. टिळक स्मारक समितीकडून देण्यात आलेला लोकमान्य टिळक पुरस्कार मोदींनी पुण्यात स्वीकारला होता. त्यानंतर मोदींनी मेट्रोच्या दोन नवीन मार्गांचं उद्घाटन केलं होतं. तसेच शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाचंही उद्घाटन पीएम मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. मोदी यांनी आपल्या भाषणातून एकप्रकारे प्रचाराचा नारळ फोडला असे बोलले जाते. पीएम मोदी यांच्या दौऱ्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुणे दौऱ्यावर येणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार यांच्या पुणे जिल्ह्यालाच सुरूंग लावायचा भाजपचा डाव असून त्यासाठीच बड्या नेत्यांचे वारंवार दौरे सुरू आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *