कुरकुंभ येथील शिवशक्ती ऑक्सीलेट कंपनीला भीषण आग: संपूर्ण परिसर स्फोटाने हादरला


पुणे —पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील शिवशक्ती ऑक्सीलेट प्रा. लि. या कंपनीच्या  डिस्टीलेशन प्लांटमध्ये मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास भीषण आग लागली. Terrible fire at Shivshakti Oxylate Company at Kurkumbh आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या आगीमुळे मोठे स्फोट होत होते. आग व स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की १५ ते २० किलोमीटर अंतरावरून आग व धुराचे लोट दिसून येत होते. यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आणि एकच खळबळ उडाली. गांव जवळच असल्याने नागरिक गाव सोडून पळाले. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

कंपनीत प्रचंड प्रमाणात रासायनिक (केमिकल) साठा होता. तो जळून खाक झाला आहे. घटनास्थळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कुरकुंभ, दौंड नगरपरिषद, बारामती एमआयडीसी येथील अग्निशमन बंब दाखल झाले होते. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.

अधिक वाचा  मराठवाड्याच्या संघर्षमय इतिहासाचे एक स्वतंत्र ऐतिहासिक संग्रहालय व्हावे- डॉ. सुरज एंगडे 

या गंभीर घटनेमुळे पुन्हा एकदा कामगार व नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून या घटनेची माहिती देऊन ग्रामस्थांनी घाबरू नये, असे आवाहन कुरकुंभ पोलिस पाटील रेश्मा विनोद शितोळे यांनी केले. दौंड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कुणीही अफवा पसरू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महाडिक यांनी केले. मागील पाच महिन्यातील ही दुसरी आगीची घटना आहे. यापूर्वी बुधवारी १४ ऑगस्ट २०१९ अल्कली आमाईन्स तसेच शुक्रवारी (दि.२२) मे २०२० कुसूम डिस्टिलेशन अॅन्ड रिफायनिंग, प्रा. लि. या कंपन्यामध्ये भीषण आगीच्या घटना घडल्या आहेत.या घटनेमुळे नागरिकांमध्ये पुन्हा घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याठिकाणी वारंवार घडणाऱ्या आग व स्फोटाच्या घटना थांबणार कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अधिक वाचा  मराठा संघर्ष यात्रेचे पुण्यातून साष्टपिंपळगावकडे प्रस्थान

जिल्हाधिकाऱ्यांनी मंगविला तातडीने अहवाल

या घटनेची दखल जिल्हाधिकारी देशमुख यांनी घेतली असून प्रशासनाला घटनेचा अहवाल तातडीने पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाला पंचनामे करण्याचेही आदेश दिले आहेत. या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असेही आवाहन त्यांनी केले आहे. औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांनी सेफ्टी ऑडिट करून औद्योगिक सुरक्षा विभागास सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील सर्व औद्योगिक वसाहतीतील कारखानदार, कारखानदारांच्या संघटना पदाधिकारी यांची बैठक खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली होती. यावेळी आपत्ती निवारण यंत्रणा, अपघातप्रवण क्षेत्रातील काळजीची उपाययोजना आदींबाबतच्या सूचना यामध्ये देण्यात आल्या होत्या.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love