पुणे(प्रतिनिधि)- मागील निवडणुकीत राहुल गांधी यांना अमेठीमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. तसेच चित्र यंदाच्या निवडणुकीत वायनाडमध्ये उभे राहिले हे लक्षात आल्यावर वायनाडमध्ये पराभव होण्याच्या भीतीने राहुल गांधी यांनी रायबरेलीमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचा टोला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी लगावला.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजिट वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. पुणे श्रमिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर आणि सरचिटणीस सुकृत मोकाशी यावेळी उपस्थित होते.
विनोद तावडे म्हणाले की, देशभरात लोकसभा निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या सभा होत आहे. या सभांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आम्ही यंदा नक्कीच ४०० पार जाऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एका बाजूला आमच्याकडे प्रत्येक ठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्ते बूथवर काम करित आहेत. तर दुसर्या बाजूला विरोधकांना बूथवर पदाधिकारी, कार्यकर्ते मिळत नाही. या मागचे एकच कारण आहे. ते म्हणजे आपण कितीही आणि काहीही केले तरी देखील नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार असल्याची भावना विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे तावडे म्हणाले.
वायनाडमध्ये हारू की काय असे वाटत असल्याने प्रियांका गांधी यांना रायबरेलीमधून उमेदवारी न देता, राहुल गांधी यांना उमेदवारी घोषित केली आहे. रायबरेलीमधून प्रियांका गांधी या निवडणूक लढविणार हे जवळपास निश्चित झाले होते. पण मागील निवडणुकीत राहुल गांधी यांना अमेठीमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. तसेच यंदाच्या निवडणुकीत वायनाडमध्ये जे चित्र उभे राहिले हे लक्षात आल्यावर वायनाडमध्ये पराभव होण्याच्या भीतीने राहुल गांधी यांनी रायबरेलीमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगत तावडे यांनी राहुल गांधींना टोला लगावला.
तावडे म्हणाले, यंदाच्या दोन टप्प्यातील निवडणूकीची टक्केवारी गेल्यावेळेच्या पहिल्या दोन टप्प्यातील टक्केवारी इतकीच राहिली आहे. मागील निवडणूकीच्या तुलनेत पहिल्या टप्प्यात भाजपच्या ९ ते १५ जागा तर दुसऱ्या टप्प्यात अंदाजे ५ ते ७ जागा वाढण्याची शक्यता आहे. यंदाच्या निवडणूकीत भाजपकडून मतदारांसमोर २०४७ च्या विकसित भारताचे व्हिजन मांडले जात आहे. तसेच प्रत्येक टप्पेनिहाय मुद्दे पुढे केले जात आहे.
याउलट विरोधी पक्षांकडून भाजप घटना बदलणार असल्याचा प्रचार केला जात असून तो साफ चूकीचा आहे. पुर्ण बहुमत असताना भाजपने कधीही घटनेला हात लावला नाही. काँग्रेसने यापुर्वी ८० वेळा घटनेत बदल केला. आम्ही फक्त ३७० कलम रद्द केले. ज्यांनी घटना लिहिली त्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कॉँग्रेसने भंडाऱ्यातून लोकसभेला उभे करून त्यांचा पराभव केला. हे मतदार चांगले ओळखतात.
राज्यात शरद पवार साहेब आपल्या सुनेचा बाहेरची सून आणि संजय राऊत अमरावतीच्या उमेदवारावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. काँग्रेसने आपल्या जाहिरातीत पहिल्यांदाच सोनिया गांधी, राहूल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचे छायाचित्र वापरले नाही. कदाचित फोटो टाकले तर मतं कमी होतील अशी भिती असल्याने त्यांनी फक्त मुद्द्यांवर भर दिला आहे.
मोदींनी ठाकरे कुटुंबियांच्या कायम पाठिशी असल्याचे विधान नुकतेच एका मुलाखतीत केले आहे. याबाबत तावडे म्हणाले, मोदींनी कधीही व्यक्तिगत राजकारण केले नाही. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्याबाबतीत सुद्धा मोदी हेच म्हणाले होते. मनसेने महायुतीला दिलेला पाठिंब्याबद्दल विकसित भारताच्या योजनेमध्ये कोणी सहभागी होत असेल तर यामध्ये वावगे काहीच नाही, असेही तावडे यांनी सांगितले.
एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश लवकरच होईल
एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश लवकरच होईल. त्याच्या प्रवेशाला देवेंद्र फडणवीस यांचा विरोध नाही. फडणवीस पक्षातील अनुभवी नेते असून त्यांनी कधीही सुडाचं राजकारण केले नसल्याचे स्पष्टीकरण तावडे यांनी दिले. आमची युती विचारधारेवर होती परंतू, उद्धव ठाकरेंनी लोकांशी गद्दारी केल्याची टीका तावडे यांनी केली. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांच्या प्रवेशावर तावडे म्हणाले, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांवर चार्जशीट दाखल आहे. न्यायालयाच्या निर्णयावर पुढचं ठरवू.