पुणे – भुशी धरण परिसरामध्ये रविवारी पाच पर्यटक वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. यानंतर या ठिकाणच्या स्थानिक व्यवसायिकांवर रेल्वे प्रशासन व स्थानिक प्रशासनाकडून आज अतिक्रमण कारवाई करत त्यांचे दुकाने टपऱ्या जमीन दोस्त करण्यात आल्या यामुळे पर्यटनावर उदरनिर्वाह करणारी शेकडो कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आली आहेत.
भुशी धरण हे मध्य रेल्वेच्या मालकीचे असून त्याच्या आजूबाजूची जागा व पायऱ्यांच्या समोरील व बाजूची जागा देखील रेल्वेच्या मालकीची आहे. रविवारी भुशी धरणामध्ये पाच पर्यटक वाहून जाऊन त्यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाकडून ही आक्रमक कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासन यांच्या सहकार्याने व मोठ्या पोलिस बंदोबस्त मध्ये आज सकाळी आठ वाजल्यापासून ही अतिक्रमण मोहीम राबवत परिसरातील शेकडो दुकाने जेसीबी मशीनच्या सहाय्याने जमीन दोस्त करण्यात आली आहेत. मागील अनेक वर्षांपासून भुशी गाव व रामनगर परिसरामधील स्थानिक व्यावसायिक भुशी धरणाच्या पायऱ्यांच्या शेजारी येणाऱ्या पर्यटकांना चहा, भजी, मक्याचे कणीस, मॅगी आदी सुविधा देत असत सोबतच धरण परिसरामध्ये येणाऱ्या पर्यटकांना सूचना देण्याचे काम देखील हेच स्थानिक व्यवसायिक वर्षानुवर्षे करत आहेत.
रविवारी जी दुःखद व दुर्दैवी घटना घडली ती भुशी धरणाच्या मागील बाजूला डोंगर भागात घडली होती. वास्तविक पाहता त्या घटनेचा व या पायऱ्यांच्या शेजारी असलेल्या दुकानांचा कसलाही संबंध नाही. असे असताना देखील प्रशासनाकडून या स्थानिक व्यवसायिकांवर अचानक मोठी कारवाई करण्यात आल्याने सर्व स्तरातून या कारवाईचा निषेध नोंदवला जात आहे. स्थानिक व्यवसायिकांनी या ठिकाणी मोठा आक्रोश केला मात्र प्रशासनाने सर्व विरोध डावलून सदरची कारवाई केली आहे.
भुशी धरण हे लोणावळा परिसरातील पावसाळी पर्यटनाचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखले जाते या ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक वर्षाविहारासाठी येत असतात याची सर्व प्रशासन यंत्रणेला माहिती असताना देखील पावसाळा सुरू होण्यापूर्वी या ठिकाणी कोणतीही पूर्वतयारी केली जात नाही. पर्यटकांना सूचना देणारे कोणतेही फलक पावसाळा सुरू होण्यापूर्वी लावले जात नाहीत. एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर खरंतर प्रशासनाला जाग येते मात्र सुरक्षेच्या दृष्टीने कोणतेही उपाययोजना या भागात आजपर्यंत झालेल्या नाहीत. येणारे पर्यटक देखील स्थानिक व्यावसायिक व आपत्ती व्यवस्थापनच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात व स्वतःच्या प्राणांतिक अपघाताला स्वतःच कारणीभूत होतात. मात्र या घटनांनंतर त्या भागामध्ये जे परिणाम होतात ते स्थानिकांना भोगावे लागत आहेत.
सोमवारी पुणे जिल्हाधिकारी व पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी भुशी धरण परिसरातील घटनास्थळाला भेट दिली होती त्यानंतर सर्व प्रशासकीय यंत्रणा यांची संयुक्त बैठक घेत प्रत्येकाला आपापल्या हद्दीमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. काही मार्गदर्शक सूचना देखील जिल्हाधिकारी कार्यालय व मावळ प्रांत अधिकारी कार्यालय यांच्याकडून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज सकाळी रेल्वे प्रशासनाकडून अचानक ही मोठी कारवाई झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. पर्यटकांच्या हलगर्जीपणामुळे दुर्दैवी घटना घडली मात्र त्या घटनेची आमचा काय संबंध आम्ही तर या ठिकाणी पर्यटकांना सुविधा देतो अशा शब्दांमध्ये दुकाने जमीन दोस्त झालेल्या व्यवसायिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.