ई-२० पेट्रोलमुळे मायलेजवर किती परिणाम होतो? एआरएआयने दिली महत्त्वाची माहिती

ई-२० इंधन, इथेनॉल मिश्रित पेट्रोल
ई-२० इंधन, इथेनॉल मिश्रित पेट्रोल

पुणे(प्रतिनिधि)–देशातील इंधन क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणणाऱ्या २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल म्हणजेच ‘ई-२०’ इंधनाच्या वापरामुळे वाहनांच्या कार्यक्षमतेत किंवा मायलेजमध्ये होणारी घट ही अत्यंत नगण्य असून, ती केवळ २ ते ६ टक्के इतकीच मर्यादित असल्याचे स्पष्टीकरण पुण्यातील ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ने (एआरएआय) दिले आहे.

पुण्यातील एआरएआयच्या मुख्य कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. पुण्यातील एआरएआयचे संचालक डॉ. रेजी मथाई यांनी यावेळी सांगितले की, कोणतीही नवीन श्रेणीतील वाहने बाजारात येण्यापूर्वी त्यांची अत्यंत कठोर तांत्रिक चाचणी घेतली जाते. ग्राहकांना सुरक्षित आणि विश्वासार्ह वाहने मिळावीत, यासाठी वाहन उत्पादक कंपन्यांकडून प्रयोगशाळा तसेच प्रत्यक्ष रस्त्यांवर सुमारे ४० हजार ते ६० हजार किलोमीटरपर्यंत या वाहनांची चाचणी केली जाते. या सर्व चाचण्या आंतरराष्ट्रीय मानकांचा दर्जा राखून व सर्व निकषांचे पालन करून घेतल्या जातात. यामुळे वाहनांचे इंजिन आणि इंधन वाहून नेणाऱ्या वाहिन्यांच्या दीर्घकालीन आरोग्यावर कोणताही विपरित परिणाम होत नाही, याची पूर्ण खात्री केली जाते. त्यामुळे ई-२० सज्ज वाहने पूर्णपणे सुरक्षित आणि खात्रीशीर आहेत.

अधिक वाचा  सशस्त्र नक्षलवाद संपला, आता 'वैचारिक आणि शहरी नक्षलवादा'चे मोठे आव्हान; पुण्यात तज्ज्ञांनी मांडले परखड विचार

वाहनधारकांमध्ये असलेल्या मायलेजच्या चिंतेवर बोलताना एआरएआयच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, मानक प्रयोगशाळेतील चाचण्यांनुसार इंधन कार्यक्षमतेत होणारा बदल हा २ ते ६ टक्क्यांहून अधिक नसतो. प्रत्यक्षात वाहनांचे मायलेज हे केवळ इंधनावर अवलंबून नसून चालकाची वाहन चालवण्याची पद्धत, रस्त्यांची स्थिती आणि वाहनाची नियमित देखभाल यांसारख्या बाह्य घटकांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या वाहनांची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी अधिकृत डीलरकडूनच नियमित सर्व्हिसिंग करून घ्यावी, असा सल्लाही यावेळी देण्यात आला.

भारतासाठी शाश्वत आणि आत्मनिर्भर पुरवठा साखळी निर्माण करण्याच्या दृष्टीने ई-२० इंधन आणि बीएस-६ मानकांचा वापर हे एक ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे. भारतीय वाहन उद्योग आणि एआरएआय देशाच्या इथेनॉल-मिश्रण आराखड्याला पूर्ण पाठिंबा देण्यासाठी सज्ज आहेत. प्रगत अभियांत्रिकी प्रक्रियेतून विकसित केलेली ही ई-२० सज्ज वाहने पर्यावरणाचे रक्षण करण्यासोबतच ग्राहकांना एक सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासाचा अनुभव देतील, असा विश्वास एआरएआयच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love