जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेखमाला- ‘मुलखावेगळी ती’: योगातून जागतिक कीर्ती मिळविणाऱ्या डॉ. पल्लवी कव्हाणे

महाराष्ट्र लेख
Spread the love

तीन वेळा जागतिक सुवर्णपदक,  योगार्जुन पुरस्कार, भारतातील सर्व विद्यापीठांच्या योगस्पर्धांमध्ये सलग सहा वेळा सुवर्णपदक अशा अनेक कामगिरी नावावर असलेल्या जगप्रसिद्ध योगतज्ञ डॉ.पल्लवी बाळासाहेब कव्हाणे यांचा विशेष परिचय…

▪️डॉ. पल्लवी कव्हाणे ह्या विश्वानंद योग स्कूलच्या प्रमुख असून महाराष्ट्रीय योग आणि आयुर्वेद प्रबोधिनीच्या प्रमुख आहेत. एम.एड.(शारीरिक शिक्षण), एम. ए.(योग), डी. लिट (साउथ अमेरिका) अशा पदव्यांनी उच्च विद्यविभूषित असतानाच केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्याही त्या योग शिक्षक परीक्षा उतीर्ण आहेत.

▪️लहानपणापासूनच त्यांना घरातच आई वडिलांकडून खेळाचे बाळकडू मिळाले. रोप मल्लखांब, जलतरण आणि योग ह्यात त्यांना विशेष आवड आहे. त्यांना ऑलिम्पिक खेळात सहभाग घेण्याची इच्छा होती, पण त्यांच्या आवडीचे खेळ ऑलम्पिकच्या यादीत येत नाहीत. मात्र तरीही निराश ना होता त्यांनी योग हेच आपले ध्येय पक्के केले आणि त्या आज जगप्रसिद्ध योग शिक्षिका आहेत. घरातूनसुद्धा त्यांना त्यांच्या ह्या कामासाठी सतत प्रोत्साहन मिळते. त्यांच्या नावे योगासनांच्या स्पर्धेतील यशाची खूप मोठी यादी आहे. तीन वेळा जागतिक सुवर्णपदक,  योगार्जुन पुरस्कार, भारतातील सर्व विद्यापीठांच्या योगस्पर्धांमध्ये सलग सहा वेळा सुवर्णपदक यासोबतच चॅम्पियन ऑफ चॅम्पियन पुरस्कार, तुळजाभवानी पुरस्कार, गुरुवर्य बीके.एस.अय्यंगार यांचेतर्फे खरे सुवर्णपदक देवून सन्मान, योगभूषण पुरस्कार, राष्ट्रीय रोपमल्लखांब सुवर्णपदक, रणजी क्रिक्रेट संघासाठी योगशिक्षक, राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये योगशिक्षिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात योग शिक्षिका असे मान-सन्मान त्यांना मिळाले आहेत.

महाराष्ट्र सरकारची योग अभ्यासक्रम समिती व बालभारतीसाठी काम करतानाच वृतपत्रांसाठी लेखनही त्या करतात. तसेच दूरदर्शन व खासगी  वाहिन्यांवर योगाबद्दल मार्गदर्शनसुद्धा त्या करतात.

पल्लवी ताईंच आवर्जून उल्लेख करावा अस कार्य म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लहान मुलामुलींना गेले २० वर्षे विनामूल्य योगशिक्षण देण्याचे व्रत अविरतपणे त्यांनी सुरु ठेवले आहे. त्यांचे सर्व विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नेत्रदीपक यश मिळवत आहेत. त्यातील काही विद्यार्थी परदेशात योगशिक्षक म्हणून कार्यरत आहेत, तसेच वृद्धाश्रम आणि मतीमंद मुलांसाठी ही योगाचे मार्गदर्शन चालू आहे.

▪️आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी आयुष मंत्रालयाने महाराष्ट्रासाठी एक “आंतरराष्ट्रीय योगदिन मार्गदर्शक पुस्तिका” लिहिण्याची संधी पल्लवीताईँना दिली होती. ती त्यांनी लीलया पार पाडली आणि खूप अभ्यासपूर्वक त्यांनी त्या पुस्तकाचे लेखन केले. तसेच त्यासाठीचे योगासन सदरीकरणही स्वतः केले. भविष्यातही योगावर विविध पुस्तके लिहिण्याचा त्यांचा मानस आहे.

तरुण पिढीला शारीरिक व मानसिक दृष्यटया सक्षम करण्यासाठी योगाचा प्रसार आणि प्रचार करण्याचे उदिष्ट्य ठेवून समाजसुधारणा करण्यात हातभार लावण्याचा त्यांचा मानस आहे, कारण योगाच्या मध्यामातूनच तरुण पिढीचा सर्वांगीण विकास होवू शकेल, अशी पल्लवी ताईची श्रद्धा आहे. 

▪️शिल्पा स्वामी-निंबाळकर▪️

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *