कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सुरक्षित पयर्टनाच्या दृष्टीने राज्य सरकारचे आता ‘कॅरॅव्हॅन’ पर्यटन धोरण.. काय आहे हे धोरण?

महाराष्ट्र
Spread the love

मुंबई -पर्यटन धोरण-2016 मधील तरतूदीनुसार तसेच कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सुरक्षित पयर्टनाच्या दृष्टीने पर्यटक खाजगी वाहनाने प्रवासास प्राधान्य देत आहेत हे पाहता, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॅरॅव्हॅन व कॅरॅव्हॅन पार्क या सुविधा पर्यटकांना उपलब्ध करुन देण्यासाठी कॅरॅव्हॅन पर्यटन धोरण राबविण्यास मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. कॅरॅव्हॅन पार्क आणि कॅरॅव्हॅन असे 2 भाग या धोरणात असून यामुळे राज्यातील वैविध्यपूर्ण निसर्ग सौंदर्याचा लाभ सहजपणे पर्यटकांना घेता येईल. तसेच रोजगार देखील वाढेल.

पर्यटन धोरण 2016 अंतर्गत उपलब्ध प्रोत्साहने जसे की, मुद्रांक शुल्कामध्ये सूट, राज्य वस्तु व सेवा कराचा परतावा, विद्युत शुल्कामध्ये सूट इ. कॅरॅव्हॅन पार्क / कॅरॅव्हॅन पर्यटनाकरीता लागू राहतील.पर्यटन संचालनालयाकडे कॅरॅव्हॅन व कॅरॅव्हॅन पार्कची नोंदणी आवश्यक राहील. कॅरॅव्हॅन व कॅरॅव्हॅन पार्क व्यावसायिकांना पर्यटन संचालनालयामार्फत मार्केटिंग, स्वच्छता, व्यवस्थापन यांचे प्रशिक्षण दिले जाईल. तसेच त्यांची प्रसिध्दी देखील करण्यात येईल.

या पर्यटन संकल्पनेमुळे पर्यटकांना राहण्याची सुविधा तसेच खाजगी गुंतवणूकीसही प्रोत्साहन मिळेल.  कौटुंबिक सहलींचे आयोजन, हॉटेल्स आणि रिसॉर्ट या पारंपरिक निवास व्यवस्थेपेक्षा वेगळा अनुभव, ना विकास क्षेत्राचा योग्य वापर, दुर्गम भागातील पर्यटनाला चालना देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे यामुळे शक्य होणार आहे.

कॅरॅव्हॅन पार्क : यामध्ये मुलभूत सोयी सुविधानी युक्त अशा जागेवर कॅरॅव्हॅन पार्क उभी करून मुक्काम करता येईल.  यामध्ये लहान मोठ्या आकाराच्या कॅरॅव्हॅन उभ्या करता येतील.  असे पार्क खाजगी किंवा शासकीय जमिनीवर स्वत: जमीन मालक किंवा विकासक उभारु शकतील.  वाहनतळाच्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा तसेच स्वतंत्र पाणी, रस्ते व वीज जोडणी असेल.  या ठिकाणी पर्यटक सुविधा केंद्र, उद्यान देखील असेल.  कॅरॅव्हॅन पार्क मालकांनी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करायच्या आहेत.  याठिकाणी पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहे देखील असतील व विकलांगाकरिता देखील व्हिलचेअर वगैरे सुविधा असतील. यासाठीच्या आवश्यक त्या परवानग्या स्थानिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जातील.

एमटीडीसीच्या पर्यटक निवासांच्या परिसरात किंवा त्यांच्या मोकळ्या जमिनीवर तसेच कृषी पर्यटन केंद्रांच्या ठिकाणी देखील कॅरॅव्हॅन पार्क करता येतील.

कॅरॅव्हॅन : या व्हॅन्समध्ये बेडची सुविधा असलेले किचन, टॉयलेट, सोफा, टेबल असून विश्रांती आणि निवासाच्या दृष्टीने त्याची बांधणी केली असेल.  सिंगल एक्सेल कन्व्हेंशल कॅरॅव्हॅन, टि्वन एक्सल कॅरॅव्हॅन, टेन्ट ट्रेलर, फोल्डिंग कॅरॅव्हॅन, कॅम्पर ट्रेलर अशा प्रकारचे कॅरॅव्हॅनचे विविध प्रकार असतील.

परिवहन आयुक्तांकडे या कॅरॅव्हॅनची नोंदणी करावी लागेल. कॅरॅव्हॅन पार्क व कॅराव्हॅन तसेच हायब्रीड कॅरॅव्हॅन पार्कची नोंदणी पर्यटन संचालनालयाकडे करावी लागेल.  तसेच टूर ऑपरेटरची नोंदणी ऑन लाईन पद्धतीने www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर करता येईल.  यासाठी नोंदणी शुल्क ५ हजार व नुतनीकरणासाठी २ हजार रुपये शुल्क असेल.

 कॅरॅव्हॅन पर्यटन धोरणासंदर्भात राज्यस्तरीय समिती असून पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अध्यक्ष असतील. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *