भाजपनचं शेतकऱ्यांना ही सवय लावून ठेवली आहे- नितीन राऊत

राजकारण
Spread the love

पुणे– वीज फुकटात तयार होत नाही. त्यासाठी कोळला लागतो, पैसा लागतो, कर्ज काढावं लागतं, ते आणायचं कुठून? महावितरणवर 56 हजार कोटीचा बोजा आलाय तो भरायचा कुठून? असा सवाल राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भाजप नेत्यांना केला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना वीज बिल भरावंच लागेल असा इशारा देतानाच, भाजपनचं शेतकऱ्यांना ही सवय लावून ठेवली आहे, असा आरोपही राऊत यांनी केला आहे.

वीज बिल थकित असल्यामुळे राज्यात कृषी पंपाचं वीज जोडणी कापण्याची मोहीम ऊर्जा विभागाकडून हाती घेण्यात आली आहे. नुकतीच पेरणी झालेली, गहू, ज्वारी, हरभरा, ऊसाला पाणी देण्याचं काम सुरु असताना वीज कनेक्शन कापलं जात असल्यानं शेतकरी अडचणीत आलाय. या पार्श्वभूमीवर भाजपकडून ऊर्जा विभागाच्या विरोधात आंदोलनं केली जात आहेत. भाजपच्या या भूमिकेबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भाजपच्या नेत्यांवरच निशाणा साधला आहे. वीज फुकटात कधीपासून मिळायला लागली? कोळसा, पाणी यापासून वीज निर्मिती होते त्याला पैसे मोजावे लागतात. वीज वापरतात मग वीज बिल भरायला का नको वाटतं? मुंबई अंधारात बुडाली तेव्हाही आम्ही तत्काळ वीज पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. भाजपने शेतकऱ्यांना सवय लावून ठेवली आहे. अडचण निर्माण केली आहे. 56 हजार कोटींचा बोजा आलाय, तो भरायचा कसा? असा सवाल राऊत यांनी केला.

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवरुनही नितीन राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधलाय. केंद्र सरकारचे दिल्लीतील नेते कशी टीका करतात हेच समजत नाही. केंद्र सरकारनं इंधनाचे दर कमी करण्याचे प्रयत्न केले नाहीत. क्रूड ऑईलचे दर कमी असताना त्यांच्याकडून कुठलेही प्रयत्न झाले नाहीत. लोकांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केंद्राकडून केलं जात आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

उत्तर प्रदेशातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. इंधनाचे दर कमी करण्याबाबत केंद्र सरकारने हा निर्णय घ्यायचा आहे. राज्य सरकारवर का ढकललं जातं? भाजपशासित राज्यांना जीएसटीचा परतावा दिला जातो, मग महाराष्ट्राला का दिला जात नाही? महाराष्ट्राकडे बोट दाखवण्याचा काम का करतात? असेही प्रश्न राऊत यांनी उपस्थित केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *