पुणे: आपल्या सिद्धहस्त लेखणीतून ‘गीतरामायण’ अजरामर करणारे आधुनिक वाल्मिकी ग.दि. माडगूळकर यांच्या नियोजित स्मारकाचे येत्या महिनाभरात भूमीपूजन केले जाणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. गदिमांच्या 101 व्या जयंती वर्षात डिजिटल स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा मानस असल्याचेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.
नियोजित स्मारकाच्या नियोजनाविषयी माहिती देण्यासाठी महापौर बंगल्यावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माडगूळकरांचे नातू सुमित्र माडगूळकर, नातसून प्राजक्ता माडगूळकर, संवाद पुणेचे सुनील महाजन आणि नगरसेविका माधुरी सहस्त्रबुध्दे उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, कोथरूड परिसरातील महात्मा सोसायटीतील 6.27 एकरमध्ये महापालिकेतर्फे प्रदर्शन केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. या इमारतीचे क्षेत्रफळ 25110 चौ.मी. असणार आहे. इमारतीच्या समोरच्या बाजूला गदिमांचे स्मारक उभाण्यात येणार आहे. या स्मारकात बांधकाम क्षेत्र सुमारे 931 चौ.मी. असणार आहे. स्वतंत्र इमारतीच्या पहिल्या मजल्यावर गदिमांचा जीवनप्रवास आणि त्यांनी लिहिलेले साहित्याची माहिती देणारे दालन, गदिमांनी वापरलेल्या वस्तूंचे दालन, गदिमांच्या मराठी आणि हिंदी चित्रपटांचे दालन, डिजिटल दालन, सभागृह आणि व्यवस्थापन कक्षाचा समावेश असणार आहे. हे प्रदर्शन केंद्र तळमजला अधिक त्यावर तीन मजले असे असणार असल्याचेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.
कर्मभूमीत स्मारक ही तर कुंटूबाची इच्छा
मागील 43 वर्षांपासून माडगूळकर कुंटूब गदिमांच्या स्मारकासाठी झगडत होते. 2019 हे गदिमांचे जन्मशताब्दिवर्ष होते. त्या वर्षात स्मारक उभारले असते, तर अधिक आनंद झाला असता. मात्र गदिमांच्या 101 जयंती वर्षात या स्मारकाच्या कामाला प्रारंभ होत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्या कर्मभूमीत स्मारक उभारले जावे. ही माडगूळकर कुंटूबाची इच्छा होती. गदिमांच्या 101 व्या स्मृतीदिनानिमित्त राज्य, देश आणि विदेशातील साहित्यिक त्यांच्या साहित्याचे सामुहिक वाचन करणार आहेत. त्यातही माडगूळकर कुंटूंब सहभागी होणार आहे. महापौरही त्यात सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. अशी भावना गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी व्यक्त केली.