रोणू मजुमदार यांच्या बासरीवरील ‘जयजयवंती’ने घेतला रसिकांचा ठाव

Pt. Ronu Majumdar
Pt. Ronu Majumdar

पुणे : बासरीच्या ( flute) हळुवार सुरावटींवर लहरणाऱ्या राग जयजयवंतीच्या (Jayajaywanti) साक्षीने रविवारी हजारो रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आणि ही किमया करणाऱ्या पं. रोणू मजुमदार (Pt. Ronu Majumdar) यांच्या मधुर बासरीवादनाने ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची अतिसुरेल सांगता झाली. (Ronu Majumdar’s ‘Jayajaywanti’ on the flute took the attention of the fans)

पं. रोणू मजुमदार यांनी समयाला अनुसरून जयजयवंती रागाचे रूप बासरीवादनातून उलगडत नेले. अतिशय शांतपणे आलापी करत त्यांनी रागविस्तार फुलवत नेला. पं. रामदास पळसुले यांचा ढंगदार तबला साथीला येताच रोणू यांची सुंदर लयकारी सुरू झाली. या वादनाचा आस्वाद आमदार रवींद्र धंगेकर तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनीही घेतला. आपल्या वादनादरम्यान पं. रोणू यांनी वारंवार रसिकांशी संवाद साधल्याने त्यांचे वादन ह्दयाला भिडणारे झाले.

अधिक वाचा  भाजपवरच्या नाराजीचा अजित पवारांना फटका - रूपाली ठोंबरे पाटील

रसिकांच्या विनंतीला मान देऊन रोणू यांनी पं. भीमसेन जोशी, लता मंगेशकर यांनी अजरामर केलेल्या आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘बाजे रे मुरलिया’ या रचनेतील सौंदर्यस्थळे दाखवली. नंतर खेमटा तालात कजरी पेश करून पं. रोणू मजुमदार यांनी सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची सांगता केली.त्यांना पं रामदास पळसुले यांनी तबला, कल्पेश साचला हे बासरी तर विनायक कोळी यांनी तानपुरा साथ केली.    

प्रकृती अस्वास्थ्यामुळे किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे गायन होऊ शकले नाही. त्यामुळे २००४ मधील पं. भीमसेन जोशी यांच्या लाईव्ह मैफलीचे दुर्मिळ ध्वनिमुद्रण सांगता प्रसंगी ऐकवण्यात आले. त्यानंतर परंपरेनुसार सवाई गंधर्व यांच्या ध्वनिमुद्रिकेने या पाच दिवसांच्या स्वरसोहळ्याची सांगता झाली.

अधिक वाचा  #हीट अँड रन प्रकरण : अल्पवयीन आरोपीचे बदललेले रक्ताचे नमुने त्याच्या आईचे? :शिवानी अग्रवाल बेपत्ता

आज दुपारच्या सुमारास सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव मंडपाच्या मागील बाजूस असलेल्या पडद्यावर तार तुटून पडल्याने तेथील कापडाने पेट घेतला. सुरक्षेच्या सर्व उपाययोजना जागीच उपलब्ध असल्याने या छोट्याश्या आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले. अग्नीशमन दलाचा बंब व कर्मचारी जे महोत्सव स्थळी कायम उपस्थित असतात त्यांच्या मदतीने सुरक्षाकर्मी आणि स्वयंसेवक यांनी परिस्थिती लगेचच नियंत्रणात आणली. मात्र, आग लागल्याचे लक्षात घेऊन, प्रसंगावधान राखून ज्यांनी त्वरित धोक्याची सूचना दिली, त्या केदार केळकर यांचा आयोजकांनी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते विशेष सत्कार केला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love