भ्रमिष्टावस्था दूर करण्याची जबाबदारी लेखकांनी पार पाडावी- राजन गवस


उदगीर : (भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी) : महाराष्ट्र हे अत्यन्त पुरोगामी राज्य असताना मराठी साहित्यात आज वैचारिक दारिद्रय निर्माण झाले आहे. आजच्या या भ्रमिष्टावस्थेत उद्याच्या महाराष्ट्राचा चेहरा कायम ठेवायचा असेल, तर लेखकांना लिहिण्याची, बोलण्याची आपली जबाबदारी पार पाडावी लागेल, अशी अपेक्षा प्रसिद्ध लेखक राजन गवस यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.

95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात छत्रपती शाहू सभागृहात डॉ. ना. य. डोळे व्यासपीठ येथे आयोजित प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. साधनाचे संपादक विनोद शिरसाठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे मराठी भाषा विभागप्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी त्यांची  मुलाखत घेतली. गवस म्हणाले, प्रत्येक माणूस भ्रमिष्ट व्हावा, त्याचा विचारांशी संबंध तुटावा, अशा प्रकारचे प्रयत्न आज होत आहेत. यात समाजाविषयी चिंतन करणारे जबाबदार लोक अल्पमतात आले आहेत. लोकहितवादी, फुले, आंबेडकरांपासून ते भा. ल. भोळेंपर्यंतची वैचारिक परंपरा जणू लोप पावली आहे. या वैचारिक दुष्काळात विचार करण्याची प्रक्रियाच बंद पडल्यासारखी स्थिती आहे. सर्व सत्ताकारणी सत्तेत भ्रमिष्ट होतात, नैतिक मूल्यांचे अधःपतन होते, तेव्हा लेखकाची जबाबदारी वाढते. लोकांना शहाणे करण्यासाठी लेखकाने लिहिले, बोलले पाहिजे.

अधिक वाचा  #हीट अँड रन प्रकरण : "मला कुणाचे फोन आले होते त्यांची नावं मी घेणार"- डॉ. अजय तावरे

शुद्धलेखनाविषयी बोलताना ते म्हणाले, शुद्धलेखन या शब्दाने खेड्यापाड्यातील पिढ्या बरबाद केल्या. खेड्यातील शेतकरी, कष्टकरी, गोरगरिबांच्या मुलांच्या बोलीला गावठी म्हणून हिणवले गेल्याने त्यांच्यात न्यूनगंड निर्माण झाला. अशुद्ध भाषा हा शिक्का बसल्याने व्यक्त होण्याचे स्वातंत्र्यच ही मुले गमावून बसली. म्हणूनच शुद्धलेखन या शब्दाला आपला आक्षेप आहे. त्याऐवजी प्रमाणभाषा लेखन नियम असा शब्द वापरावा. तसा ठरावही महामंडळाने करावा. त्याचबरोबर अशा विषयांवर अधिक संशोधन व्हावे.  भाषाशास्त्रानुसार कोणतीही भाषा ही शुद्ध वा अशुद्ध नसते. ती भाषाच असते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

मराठी शाळांविषयी चिंता व्यक्त करताना ते म्हणाले, आज मराठीसह एकूणच शिक्षणाची अवस्था दयनीय आहे. जि. प. शाळांमुळे आम्ही शिकलो. आता गावोगावी इंग्रजी शाळांची निकृष्ट डबडी विणली गेलीत. येथे घातले, की मुले शिकतात, असा एक भ्रम पालकांमध्ये निर्माण झाला आहे. मातृभाषेतच शिक्षण हवे, हे जगाने मान्य केले आहे. मात्र इंग्रजीच्या हैदोसात मराठी शाळा बंद पडणार असतील, तर विशेषतः मुलींची पुढची पिढी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती आहे. खासगी शाळांचे पेव फुटल्याने शेतकरी, कष्टकरी, गरिबांचे शिक्षण हिरावले जाऊ शकते. म्हणून जागते रहावे लागेल.

अधिक वाचा  पवारांचा शिवसेनेला आणि सामनाला आताच पुळका कसा आला?-नारायण राणे

मला ग्रामीण शब्द मान्य नाही. त्यात तुच्छभाव जाणवतो, असे सांगत कृषिजन मूल्य व्यवस्थेत समूहभाव व सहानुभाव केंद्रस्थानी आहे. पशु, पक्षी, प्राणी सर्वांनी जगले पाहिजे, ही त्यामागची संकल्पना आहे. नागर भद्र लोक व कृषी जन संस्कृती या वेगळ्या आहेत. भविष्यात याची लेखन रुपात मांडणी करणार असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

आपला कवी, कथाकार, कादंबरीकार, कार्यकर्ता, प्राध्यापक हा प्रवासही त्यांनी उलगडून दाखविला. सीमावर्ती गडहिंग्लज परिसरात बालपण गेले.  शिक्षणाचे वातावरण नव्हते. पण, पशू, पक्षी,  प्राणी यांच्यासोबत  जगण्यातील विविध गोष्टी कळत गेल्या. दहावीत पुस्तक वाचनाचा छंद जडला, अर्थात तो शिक्षकांमुळे.  या शिक्षकांना मुलांनी वाचावे, याविषयी तळमळ असे. प्रश्नोत्तरेही होत. त्यातून घडण झाली. दहावीत पहिली कविता लिहिली. कवितेतूनच लेखन प्रवास सुरू झाला. ती आजही सोबत आहे.  पुढे कथा, कादंबरीकडे वळलो.  बन्ने सर, अच्युत माने यांच्यामुळे चळवळींशी संबंध आला. तालुका परिसरातील देवदासींचे चित्र मांडण्यासाठी पत्रकारांना बोलावले जाई. पण, अनिल अवचट वगळता बहुतेकांनी विपरितच चित्र मांडले. त्यामुळे तू का लिहीत नाही, असे सरांनी म्हटल्यावर स्वतः लिहिले. अनिल अवचट यांनीही प्रेरणा दिली. त्यातून चौंडकं, भंडारभोग या कादंबऱ्या आकाराला आल्या, असे नमूद करत लेखक याच्या जगण्यावर लिहीत असतो. त्यामुळे त्याला वेगळ्या आत्मचरित्राची गरज नसते, असे मत त्यांनी नोंदवले.

अधिक वाचा  इतर अभ्यासक्रम बंद करून ३३  कोटी देवांचे अभ्यासक्रम सुरू करा- छगन भुजबळ

 प्रत्येकावर पूर्वजांचा प्रभाव असतो. त्यांच्या खांद्यावर बसून जग पाहता येते. नेमाडे, भाऊ पाध्ये यांच्याबद्दल तसे म्हणता येईल. नेमाडेंनी लेखनाचा परीघ बदलला. त्यामुळे आम्हाला लिहिणे सुखकर झाले. त्याकरिता कुणी नेमाडपंथी म्हटले तरी चालेल. होय आहे मी नेमाडपंथी, असे त्यांनी सांगितले. जे. पी. नाईक यांचा पूर्ण अहवाल स्वीकारला असता, तर आज देशाचे शिक्षणाचे चित्र वेगळे असते, असेही गवस म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love