पुणे- एक जानेवारी रोजी कोरेगाव-भिमा येथे हजारो लोक विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येत असतात. दरम्यान, या पार्श्वभूमीवर दिनांक ३१ डिसेंबर रोजी पुन्हा एल्गार परिषद भरविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी ही परिषद भरवण्यासाठी पुण्यातल्या स्वारगेट पोलीस ठाण्यात परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला आहे.
निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे- पाटील यांच्या पुढाकाराने निवृत्त शासकीय अधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. या परिषदेच्या नियोजना संदर्भांत नुकतीच साने गुरुजी स्मारकाच्या आवारात बैठक घेण्यात आली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. ही परिषद गणेश कला क्रीडा रंगमंच येथे घेण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे त्यानुसार नोंदणी करण्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे तसेच पोलिसांकडे त्याबाबतची परवानगी मागण्यात आली आहे. जातीयवाद, दडपशाही आणि हुकूमशाही विरोधात लढणारे वक्ते या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. दरम्यान गेल्या वेळेचा अनुभव पाहता पोलीस या परिषदेला परवानगी देणार का याबाबत साशंकता आहे मात्र जर परवानगी नाकारण्यात आल्यास त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्यात येईल असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
31 डिसेंबर 2017 मध्ये एल्गार परिषद शनिवार वाड्यात घेण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोरेगाव भीमा येथे मोठा हिंसाचार झाला होता. या हिंसाचाराच्या घटनेला एल्गार परिषद कारणीभूत असल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली होती. एल्गार परिषदेशी संबंधीत काही विचारवंत आणि दिग्गजांवर कारवाई करण्यात आली होती. तसेच याप्रकरणाचा तपास NIA कडे सोपवण्यात आलं आहे.
गर्दी न करण्याचे आवाहन
यंदा कोरोनाचे सावट असल्याने या ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे 1 जानेवारी रोजी देखील दूरदर्शन आणि सोशल मीडियावरून दिवसभर प्रसारण राहणार आहे. तसेच या ठिकाणी कोणत्याही राजकीय सभा किंवा स्तकांचे स्टॉल उभारण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोनाच्या श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.