पुणे- जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सर्व तपासण्यांचे अहवाल नॉर्मल आल्याने आज त्यांना येथील रुबी हॉल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सर्व तपासण्यांचे अहवाल नॉर्मल आले असल्याने वयाच्या 85 व्या वर्षीही अण्णा पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे डॉ. परवेझ ग्रँट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगीतले आहे. नियोजित सर्व तपासण्या पूर्ण झाल्याने डॉक्टरांनी अण्णांना राळेगणला जाण्यास परवानगी दिली. त्यानुसार अण्णा राळेगणकडे रवाना झाले आहेत.
छातीत हलके दुखत असल्याची अण्णांची तक्रार होती. त्यामुळे गुरुवारी सकाळी त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. रुबी हॉल क्लिनिकमधील तज्ञांच्या टीमने त्यांची तपासणी केली असता ईसीजीमध्ये किरकोळ बदल दिसून आले. त्यानंतर डॉ. पी. के. ग्रँट आणि डॉ. सी. एन. मखले यांच्या मार्गदर्शनाखाली अँजिओग्राफी करण्यात आली होती.
रुग्णालयाचे मुख्य हृदयरोगतज्ञ आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. ग्रँट म्हणाले, अण्णांच्या अँजिओग्राफीमध्ये अण्णांच्या वयोमानाप्रमाने एक किरकोळ ब्लॉकेज दिसून आल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले होते. त्यादृष्टीने योग्य वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत. काल सर्व मुख्य तपासण्या करण्यात आल्या होत्या. उर्वरित तपासण्या आज सकाळी करण्यात आल्या. त्यानंतर अण्णांनया घरी जाण्यास परवानगी देण्यात आली.
अण्णांना रुग्णालयातून निरोप देण्यासाठी रुबी हॉल क्लिनिकची संपूर्ण टिम उपस्थित होती. डॉ. परवेझ ग्रँट, डॉ. मखळे, डॉ. मुनोत यांनी अण्णांच्या सर्व तपासण्या केल्या. काही दिवस अण्णांनी संपूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला असल्याने किमान एक आठवडा कार्यकर्त्यांनी अण्णांना भेटण्याचा आग्रह धरू नये, असं आवाहन अण्णांच्या कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.
दरम्यान अण्णा रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातम्या पसरल्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे अण्णांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली. अण्णांच्या सोबत स्वयंसेवक श्यामकुमार पठाडे व संदीप पठारे आहेत.