पुणे- राज्यात कोरोनाने उच्छाद मांडला आहे. रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन न मिळाल्याने काहींचा मृत्यू झाला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याने काळाबाजार सुरू असून अव्वाच्या सव्वा किमतीला कोरोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक हे इंजेक्शन विकत घेत आहेत. मंगळवार पर्यंत तरी पुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होणार नसल्याचे सांगितले जात आहे. अशी परिस्थिती असताना या रेमडेसिवीर इंजेक्शनवरुन महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये रण पेटले आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात करणारे ब्रुक फार्मा कंपनीचे संचालक राजेश डोकानिया यांना शनिवारी रात्री त्यांच्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले व त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा असल्याच्या कारणावरून अटक केली. मात्र, ही बातमी कळताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर थेट पार्ले पोलिस ठाण्यात पोहचले. डोकानिया यांच्या अटकेवरून फडणवीस, दरेकर यांची पोलिसांबरोबर वादावादी झाली. डोकानिया यांच्याकडे 60 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा असल्याच्या संशयावरून त्यांना चौकशीसाठी विलेपार्ले पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. मात्र, त्यांच्याकडे सर्व कायदेशीर कागदपत्रे असल्याने त्यांना सोडून देण्यात आले.
हा सर्व प्रकार घडल्यानंतर पुन्हा राजकीय वादंगाला सुरुवात झाली. राज्याचे गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या संचालकांची चौकशी पोलिस करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप केला आणि हा सरकारी कामातील हस्तक्षेप असून त्यावर कारवाई करण्याबाबत सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचा इशारा दिला.
वळसे पाटील यांच्या या वक्तव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे. खुशाल गुन्हा दाखल करा, आम्ही घाबरत नाहीत. अनिल देशमुखही धमक्या देत देत गेले, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. ‘महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे. त्यामुळेच सर्व काही केंद्रावर ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोरोनाच्या काळात सत्ताधाऱ्यांनी असं राजकारण करणं योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनी रोज खोटे आरोप करणं थांबवावं, असं सांगतानाच दिलीप वळसे पाटील तुम्ही कसल्या केसेस दाखल करताय. खुशाल गुन्हा दाखल करा. आम्ही घाबरत नाही. अनिल देशमुखही धमक्या देत देतच गेले, असं पाटील म्हणाले. दिलीप वळसे पाटील हे सौम्य वाटले होते. पण इंजेक्शन दिल्यावर तेही पुढे जात असतात,’ असा टोलाही त्यांनी लगावला.