बारामती (प्रतिनिधी): बारामतीतील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा प्रवास उलगडताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाचा आवर्जून उल्लेख केला. “आज माझा धंदा आणि माझं सगळं कसं चाललंय? चांगलं चाललंय. माझ्या आजोबांच्या पुण्याईनं, माझ्या बापाच्या पुण्याईनं, माझ्या चुलत्याच्या पुण्याईनं उत्तम चाललंय,” असे अजित पवार यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला . अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे पवार कुटुंबातील मनोमिलनाच्या आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर आला आहे. अजित पवारांनी थेट आपल्या चुलत्यांच्या ‘पुण्याई’चा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
आपल्या राजकीय कारकिर्दीविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, “पहिल्यांदा तुम्ही साहेबांनी दिलेला उमेदवार म्हणून मला निवडून दिलं, खासदार केलं. काय अजित पवारांचं काम बघून केलं नव्हतं. नंतर त्याला त्याचं काम दाखवावं लागलं.” शरद पवारांच्या मार्गदर्शनातून आपली राजकीय कारकीर्द घडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बारामती तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारासाठी घेतलेल्या सभेत अजित पवारांनी सुरुवातीला पृथ्वीराज जाचक यांचं कौतुक केलं. ‘ येथे झालेल्या या सभेत अजित पवार यांनी पृथ्वीराज जाचक यांच्या कामाचे कौतुक केले. “ज्याला स्वत:चा प्रपंच करता येत नाही, तो २२ हजार ८०० सदस्यांचा प्रपंच करु शकत नाही,” असे म्हणत त्यांनी जाचक यांच्या व्यवस्थापन कौशल्याचे कौतुक केले. “कोणी माई का लाल आहे का? ज्यानं सांगावं बापूंनी आमचे पैसे बुडवलेत? कोणी असेल तर आता राजकारण सोडून देईन आणि निघून जाईन. आहे का कोणी माई का लाल?” असा सवाल अजित पवारांनी विरोधकांना विचारला.