पुणे(प्रतिनिधि)—लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी बारामतीमध्ये केलेल्या एका वक्तव्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत असून अजित पवार यंदा बारामतीतून विधानसभेची निवडणूक लढणार नसल्याची चर्चा होत आहे. अजित पवार यांच्या ऐवजी आता त्यांचे पुत्र जय पवार बारामतीतून विधानसभेची निवडणूक लढणार चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून बारामतीतून युगेंद्र पवार यांना विधानसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा बारामतीत युगेंद्र पवार विरूद्ध जय पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवार यांनी जाहीर भाषणात एक विधान केलं होतं. अजित पवार यांचं हेच भाषण सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या भाषणातील अजित पवारांचं वक्तव्य पाहता अजित पवार आता बारामतीतून विधानसभा निवडणूक लढणार नसल्याची चर्चा होत आहे. 16 फेब्रुवारीचं अजित पवार यांचं हे भाषण आहे. लोकसभेला बारामतीतून आपल्या विचारांचा खासदार निवडून दिला नाह तर मी बारामतीतून विधानसभा निवडणुकीला उभं राहीन. नाती तर तुम्ही जर मला साथच देणार नसाल तर मला माझा संसार आहे. मी निवडणूक लढणार नाही, असं अजित पवार या सभेत म्हणाले होते. त्यांचं हे भाषण सध्या व्हायरल होत आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पवार कुटुंब एकमेकांच्या विरोधात निवडणुकीत उभं होतं. सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशा झालेल्या या लढतीत सुप्रिया सुळे जिंकल्या. मात्र त्यानंतर आता अजित पवार यांच्या जुन्या भाषणाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अजित पवार यंदाची विधानसभेची निवडणूक लढणार नसल्याचं बोललं जात आहे.