पुणे(प्रतिनिधी): आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेयर्स असोसिएशनच्या (एईएसए) अध्यक्षपदी आर्कि. शेखर गरुड, तर मानद सचिवपदी आर्कि. अलोका काळे यांची निवड करण्यात आली. चेअरमनपदी आर्कि. महेश बांगड, उपाध्यक्षपदी आर्कि. संजय तासगावकर, खजिनदारपदी अभियंता नितीन भोळे, मानद सहसचिवपदी आर्कि. मनाली महाजन व आर्कि. आनंद कुंकुलोळ यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून आर्कि. निनाद जोग, अभियंता जयंत पटवर्धन, आर्कि. रमा वेलणकर, आर्कि. जान्हवी पाटील, आर्कि. अभया बाभुळकर आणि अभियंता अमेय वाळवेकर यांचा कार्यकारिणीत समावेश आहे.
जागतिक वास्तुकला दिनानिमित्त २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी निवडलेल्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ, तसेच शिक्षक दिन सोहळा नुकताच पार पडला. ‘एईएसए’च्या वतीने वास्तुकला आणि अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या चार शिक्षकांचा विशेष गौरव करण्यात आला. यामध्ये वास्तुविशारद प्रा. प्रसन्न देसाई, वास्तुविशारद प्रा. श्रीकांत भाटे, नागरी अभियांत्रिकी शिक्षणातील योगदानाबद्दल प्रा. समीर शास्त्री आणि प्रा. अनिता बेनिंजर-गोखले यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे विश्वस्त आर्कि. दिवाकर निमकर, आर्कि. विश्वास कुलकर्णी, आर्कि. जयंत इनामदार, नवनिर्वाचित अध्यक्ष आर्कि. शेखर गरुड, मावळते अध्यक्ष आर्कि. राजीव राजे यांच्यासह वास्तुविशारद, अभियंते, प्राध्यापक आणि बांधकाम क्षेत्रातील विविध व्यावसायिक उपस्थित होते.
अभियंता शिवदत्त पाटणे यांनी आपल्या व्यावसायिक प्रवासाची आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील कामाची माहिती दिली. आर्कि. शितेश अग्रवाल यांनी वास्तुरचनेतील विविध संकल्पना, डिझाइनविषयक दृष्टिकोन आणि प्रत्यक्ष कामातील अनुभव सांगितले. कार्यक्रमात बंगळुरू येथील ज्येष्ठ वास्तुविशारद कृष्णराव जैसिम यांच्या कार्यावर आधारित ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या ग्रंथाचे लेखक डॉ. आनंद गोपाल नाईक यांनी ग्रंथाची ओळख करून देत जैसिम यांचा वास्तुकलेतील प्रवास, त्यांची महत्त्वाची कामे आणि वास्तुरचनेविषयी सांगितले.
आर्कीटेक्ट महेश बांगड यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. मागील दोन वर्षात झालेले कार्यक्रम, संस्थेनी घेतलेले उपक्रम यांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. संस्थेचा विस्तार, स्पर्धा यांविषयी माहिती दिली. तर अध्यक्षपदी निवड झालेल्या शेखर गरुड यांनी नव्या जबाबदारीबद्दल आनंद व्यक्त करत येत्या काळात आपण संस्था आणि सदस्यांच्या विकासासाठी योगदान देणार असल्याचे सांगितले. पुरस्कार मिळालेल्या प्रा. प्रसन्न देसाई, प्रा. श्रीकांत भाटे, प्रा. समीर शास्त्री आणि प्रा. अनिता बेनिंजर-गोखले यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्कि. अभया बाभुळकर व आर्कि. रमा वेलणकर यांनी केले तर आभार अलोका काळे यांनी मानले.












