पुणे –कारवरील नियंत्रण सुटून गाडी डिव्हायडरला धडकल्याने अभिनेते हेमंत बिर्जे आणि त्यांच्या कुटुंबीयांना पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात झाला. यामध्ये बिर्जे यांच्यासह त्यांची पत्नी अमना हेमंत बिर्जे आणि कन्या रेश्मा तारिक अली खान यांना दुखापत झाली आहे. तिघांनाही उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून हेमंत बिर्जे यांची प्रकृती स्थिर आहे.
मुंबईत वास्तव्यास असलेले सिनेअभिनेता हेमंत बिर्जे यांना सर्दी झाली. बदलेल्या हवामानाचा हा परिणाम त्यांना जाणवू लागला. म्हणून त्यांनी पुण्याच्या घरी जायचं नियोजन केलं. मंगळवारी सायंकाळी बिर्जे, त्यांच्या पत्नी आणि मुलगी हे पुण्याला निघणार होते. पण तत्पूर्वी हेमंत बिर्जे यांनी सर्दीवरच्या दोन गोळ्या खाल्ल्या आणि मग चारचाकी गाडीचे स्टेरिंग हाती घेतलं. मुंबईतील प्रवास पूर्ण करून ते द्रुतगती मार्गाला लागले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाट, खंडाळा आणि लोणावळा ही त्यांनी मागे टाकला. पण उर्से टोल नाक्या जवळ बिर्जे यांच्या डोळ्यावर झापड आली. सर्दीच्या गोळ्यांमुळं त्यांना झोप येऊ लागली.
डोळे ताणण्याचे प्रयत्न ते करत होतेच पण उर्से गावाच्या हद्दीत त्यांना झोप लागली. पुढं जाऊन नको ते घडलं. बिर्जे यांचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी डिव्हायडरला जाऊन धडकली. या अपघातात स्वतः हेमंत बिर्जे, त्यांच्या पत्नी आणि मुलगी जखमी झाली. खाजगी रुग्णालयात त्यांना अपघाताचे कारण विचारले असता, त्यांनी सर्दीवरील औषधं खाऊन गाडी चालवत असल्याचे कबूल केले. पण या गोळीने त्यांना इतकी गुंगी आली होती की गाडीतून कोण-कोण प्रवास करत होते, याचा ही त्यांना विसर पडला होता. काही क्षणानंतर सोबतीला फक्त पत्नी आणि मुलगी होती हे त्यांना आठवलं. ‘टारझन’ या हिंदी चित्रपटातील भूमिकेमुळे अभिनेते हेमंत बिर्जे लोकप्रिय झाले.