धडधाकट व्यक्तिंना आत्मचिंतन करायला लावणारा संघर्ष आणि मुल्यांचा रोमांचकारी प्रवास


पुणे– नांदेड जिल्ह्यातील किनवट सारख्या अतिदुर्गम भागात रुग्णालयाची उभारणी करणारे आणि अनेक सामाजिक कामे करणारे डाॅ. अशोक बेलखोडे आणि स्वतःवर ओढावलेल्या संकटांचा स्विकार करत त्याचे संधीत रुपांतर करणारे बहुविकलांग टिंकेश काैशिक या दोघांचा संघर्ष आणि मुल्यांचा रोमांचकारी प्रवास उलगडला. अतिउच्च कसोटीच्या क्षणांना सामोरे जातांना सर्वार्थाने परिपूर्ण असलेल्या धडधाकट व्यक्तिंनी पुन्हा एकदा आत्मचिंतन करावे, असाच हा संघर्ष होता.  

डाॅ.अनिता अवचट यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिल्या जाणा-या डाॅ.अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कारांचे आज मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि अभिनेते डाॅ. मोहन आगाशे यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. प्रत्येकी रूपये वीस हजार आणि स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी डाॅ. अशोक बेलखोडे आणि टिंकेश काैशिक यांना यंदाचा डाॅ.अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ डाॅ. आनंद नाडकर्णी पुरस्कारर्थींशी संवाद साधत त्यांचा संघर्षमय जीवनपट उलडगडला. यावेळी व्यासपीठावर लेखक अनिल अवचट, ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि अभिनेते डाॅ. मोहन आगाशे, संघर्ष पुरस्काराचे मानकरी डाॅ. अशोक बेलखोडे,संघर्ष पुरस्काराचे मानकरी टिंकेश काैशिक आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

अधिक वाचा  जुनी सांगवीतील लिटिल फ्लॉवर व भारतीय विद्यानिकेतनमध्ये महिला दिनानिमित्त ‘ती’चा जागर


डाॅ. अशोक बेलखोडे त्यांच्या खडतर प्रवासाबाबत प्रकट मुलाखतीत म्हणाले की, साने गुरुजी, बाबा आमटे, अनिलबाबा अवचट यांसारख्या कृतीशिल व्यक्तींची वस्तुनिष्ठ उदाहरणे समोर होती. शालेय जीवनात अभ्यासात थोडा ठिकठाक होतो. नागपूरच्या मेडिकल महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर गांभिर्याने अभ्यास करुन सर्जन झालो. घरात सेवा आणि भक्तिभावाचे वातावरण होते, त्यामुळे तो संस्कार रुजला होताच. गाडगे महाराज आमच्या घरी येत असत. त्यांच्या कीर्तनामध्ये माझे वडिल त्यांना पेटीची साथ संगत करीत असत.  पुढे ‘हॅलो’ या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात निश्चित केले. ‘हॅलो’मुळे ग्रामीण भागाशी नाळ जोडली गेली. ‘हॅलो’चेच बोट धरून मी सामाजिक कार्यात ओढला गेलो. मी आज सर्जन म्हणून काम करीत असताना मी प्रसुतीतज्ज्ञ व्हायला पाहिजे होते, असे एका क्षणी वाटून जाते. महिलांचे आरोग्य हा आजही खूप दुर्लक्षित विषय असून 3.2 हिमोग्लोबीन असलेल्या महिला आजही माझ्या रूग्णालयात येतात. बाबा आढाव, बाबा आमटे आणि अनिलबाबा अवचट या तिघांचा माझ्या मनावर प्रचंड प्रभाव होता. बाबा आमटे यांनी पुकारलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेत सक्रीय सहभाग घेतल्यामुळे भारताच्या ग्रामीण भागात काम करण्यास अनेक संधी आहेत, याची जाणीव झाली. ‘भारत जोडो’ यात्रेचा समन्वयक या नात्याने सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारी रूजली. आरोग्य, विज्ञान, मुलींचे शिक्षण, शेतकरी आत्महत्या या सर्वच क्षेत्रात आज माझे काम सुरू असून साने गुरूजी रूग्णालय हा त्याचा मोठा विस्तारीत कॅनव्हास आहे. वर्षाला पंधरा हजार रूग्ण आमच्याकडे येतात आणि आतापर्यंत तीन लाख रूग्ण आमच्या साने गुरूजी रूग्णालयातून उपचार घेऊन गेले आहेत.

अधिक वाचा  बंद टोलनाक्यांचे सांगाडे हटवा, अन्यथा जाहीर लिलाव करू: छावा मराठा संघटनेचे रामभाऊ जाधव यांचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला इशारा

रचनात्मक काम करतांना अनेक पातळ्यांवर संघर्षाला सामोरे जावे लागते. किनवटसारखे अतिदुर्गम खेडेगाव असेल, तर तिथल्या समस्या अजूनच बिकट असतात. 18-18 तास लोड शेडिंग, प्रशिक्षित माणसांचा अभाव अशा अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. परंतु, बाबा आमटे यांनी पेरलेला विश्वास निराशा येऊ देत नाही. निष्ठा आणि समर्पणाचा भाव मनात असल्याने हे कार्य पुढे जाईल. समाजातील प्रश्न बदलत आहेत. एकट्या माणसाकडून ते प्रश्न सुटणारे नाहीत. समुहाने एकत्र येऊन या प्रश्नांना भिडणे आवश्यक आहे. किनवटला अत्याधुनिक रूग्णालय उभारण्याचे स्वप्न उराशी बाळगून मी मार्गक्रमण करीत आहे. श्रीकर परदेशी यांच्या प्रयत्नातून पाच एकर जागा मिळाली असून हॉस्पीटल उभारण्याचे काम सुरू झाले आहे. विचारांनी भारावलेली आणि संस्कार करणारी पिढी कमी होत चालल्याने खेड्यांमध्ये येऊन काम करण्यास डॉक्टर तयार नाहीत. खेड्याकडे येऊन डॉक्टरांनी सेवा द्यावी, यासाठी मी प्रयत्नशील आहे, असे ते म्हणाले.

अधिक वाचा  पुण्यातील संचारबंदीच्या विरोधात व्यापारी संघटनांचा एल्गार: काळ्या फिती लावून केले साखळी आंदोलन


यावेळी बोलताना टिंकेश कौशिक म्हणाले की, प्रत्येकाच्याच आयुष्यात संघर्ष येतो. आज मला मिळालेल्या या पुरस्कारामुळे माझ्या संघर्षाला चेहरा मिळाला आहे. वयाच्या नवव्या वर्षी विजेचा शॉक लागल्याने मला हे अपंगत्व आले. परंतु, या अपघातानंतर खचून न जाता त्याचा स्वीकार केल्यामुळे संघर्षाची धार कमी झाली. मी आजही माझ्यातील क्षमता बोलून, पटवून सांगण्यापेक्षा कृतीतून सिद्ध करण्यावर अधिक भर देतो. हैद्राबादमधील आदित्य मेहता फौंडेशनने कृत्रिम पायांसाठी मला केलेली मदत खूप उपयोगी ठरली. माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणे आणि स्काय डायव्हिंग करणे हे माझे आगामी लक्ष्य असून शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. आयुष्यातील कसोटीचे अनेक क्षण पार करून मी पुढे आलो आहे आणि अॅडव्हेंचर स्पोर्टसमध्ये नाव कमावणे हे माझे ध्येय आहे. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love