पुणे(प्रतिनिधि)–: माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी आर्टस्, डिझाईन अँड टेक्नॅालॅाजी युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वंदन भारतमातेला’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम प्रजासत्ताक दिन म्हणजेच २६ जानेवारी रोजी सायं. ४.३० वा. राजबाग लोणी काळभोर येथील संत ज्ञानेश्वर-संत तुकाराम महाराज विश्वशांती घुमटाच्या प्रांगणात होईल. ७०० हून अधिक गायक व वादकांद्वारे संगीत मानवंदनेचा कार्यक्रम असेल. अशी माहिती एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्र्वनाथ कराड व कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी डब्ल्यूपीयूचे सल्लागार डॉ. संजय उपाध्ये व दूरदर्शनचे माजी संचालक डॉ. मुकेश शर्मा उपस्थित होते.
या कार्यक्रमास चित्रकर्मी आणि व्ही शांताराम फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. किरण शांताराम, सुप्रसिद्ध गायक, संगीतकार आणि विचारवंत पं. हृदयनाथ मंगेशकर, प्रख्यात गायिका श्रीमती उषाताई मंगेशकर उपस्थित राहणार आहेत. तसेच विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड आणि एडीटीयूचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड उपस्थित राहणार आहेत.
भारतीय सिनेसृष्टीच्या सुवर्णयुगाचे एक प्रमुख शिल्पकार, महान शोमन अशी ओळख असलेले स्व. श्री. राजकपूर यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून तसेच विश्वगानसम्राज्ञी भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर यांच्या स्मृतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहणारा आहे. ‘संगीत साधनेतून ईश्वरदर्शन आणि शांतरसाची अनुभूती’ देणारा हा विशेष कार्यक्रम आहे.
कार्यक्रमाची सुरूवात भारतीय संगीताचा अध्वर्यू मानल्या गेलेल्या पखवाज या प्राचीन वाद्यापासून होईल. तबला, व्हायोलिन, बासरी आदि वाद्यांच्या एकल वादनासह सिनेसृष्टीतील गाजलेली काही गीतांचे सादरीकरण करण्यात येईल. भारतमातेला वंदन करणार्या गीतांसह सिंथेसायझर (कीबोर्ड), गीटार अशा आधुनिक वाद्यांचा मेळ रसिकांना मंत्रमुग्ध करेल. एमआयटी संस्थेची श्रद्धा व आस्था असलेल्या वारकरी संप्रदायाच्या काही भजनांचा समावेश करून सामूहिक पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता होईल.
आयोजित कार्यक्रमाची संकल्पना-संरचना एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांची आहे. विशेष बाब म्हणजे, भारतरत्न लता मंगेशकर ह्या माईर्स एमआयटीच्या विश्व शांती संगीत कला अकादमीच्या अध्यक्षा होत्या, त्यामुळे या कार्यक्रमास विशेष महत्त्व आहे.
भारतीय प्रजासत्ताकाची स्थापना ही भारताचे सार्वभौमत्व व लोकशाही मूल्यांवरील श्रद्धा व विश्वास दृढ करणारी घटना ७५ वर्षापूर्वी म्हणजेच २६ जानेवारी १९५० रोजी घडली. हे वर्ष साजरे करण्यासाठी व सार्वभौम प्रजासत्ताक भारतमातेला वंदन करण्यासाठी याचे आयोजन केले आहे. योगायोगाने डिसेंबर २०२४ मध्ये स्व. राजकपूर यांची १०० वी जयंती व गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचा दुसरा स्मृतिदिन ६ फेब्रुवारी रोजी असल्यामुळे त्यांना देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितिक मानवंदना दिली जाईल.
हा कार्यक्रम सर्व रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिका डब्ल्यूपीयू व एडीटीयूच्या सुरक्षा विभागात उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविण्याचे आवाहन माईर्स एमआयटी शिक्षण समूहातर्फे केले आहे.