पुणे- माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत बैलगाडा शर्यतीसंदर्भात करण्यात आलेला कायदा न्यायालयाने वैध ठरविला आहे. हा राज्यातील शेतकऱ्यांचा आणि महाराष्ट्राचा विजय असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे दिली.
बैलगाडा शर्यतीला न्यायालयाने हिरवा कंदील दाखविला असून, या निर्णयासंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, यासंदर्भातील कायद्याला काही प्राणीप्रेमी मंडळींनी विरोध दर्शवित त्याविरोधात याचिका दाखल केली होती. त्यामुळे यासंदर्भात शास्त्रीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीने बैल हा धावणारा प्राणी आहे, असा अहवाल दिला. सर्वोच्च न्यायालयात सदर अहवाल सादर करण्यात आला. पुन्हा युतीचे सरकार आल्यावर देशाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात याबाबतचा अहवाल सादर केला गेला. त्यावर आधारित महाराष्ट्राचा बैलगाडा शर्यतीचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरविला आहे. हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विजय आहे. सर्वांचे आभार
या सगळ्या प्रकरणांमध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे, गोपीचंद पडळकर, राहुल कुल, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत सातत्याने पाठपुरावा सातत्याने केला. लांडगे हे तर प्रतिनिधी म्हणून न्यायालयात हजर होते. विशेष वकिलही त्याच्यामार्फत नेमण्यात आला होता. याकामी अनेकांची मदत सरकारला झाली असून त्या सर्वांचे आभार मी मानतो. हा शेतकऱ्यांचा आणि महाराष्ट्राचा मोठा विजय आहे. आम्ही जी मेहनत केली आज ती खऱ्या अर्थाने यशस्वी झाली आहे, अशी भावनाही फडणवीस यांनी व्यक्त केली.