पुणे- गेल्या पाच वर्षापासून पुण्यात खासदार, आमदार भाजपचे असून पुणे महापालिका देखील त्यांच्याच हाती होती, मात्र एवढे असूनही कसबा विधानसभा मतदारसंघाचा अपेक्षित विकास का झाला नाही ? कसब्याच्या विकासासाठी राज्य व केंद्राकडून मोठा निधी का आणला नाही? काहीही विकास काम केले नाही तरी आपण निवडून येतो हिच मानसिकता असल्याने भाजपचे विकासाकडे दुर्लक्ष झाले. एवढेच नव्हे, तर ते विकासाचे ‘स्पीड ब्रेकर’ बनले आहेत. आता मात्र कसब्यातील मतदार विकासासाठी उत्सुक असून ते निश्चित परिवर्तन घडवतील, असे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मित्र पक्षांचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी शुक्रवारी (ता.१०) रोजी रात्री संपलेल्या पदयात्रेनंतर बोलताना सांगितले.
दुपारी चार वाजता कागदीपुरा येथून पदयात्रेला सुरुवात झाली. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे मोठे झेंडे घेतलेले तीन तरुण प्रारंभी, त्यानंतर ढोल-ताशा पथक आणि नंतर उमेदवार येत असल्याची माहिती देणारा रिक्षा अशा सूत्रबद्ध रचनेने पदयात्रेचे नियोजन करण्यात आले होते. उमेदवार रवींद्र धंगेकर हे रस्त्याच्या दोन्ही दुतर्फा असलेल्या नागरिकांना, व्यापाऱ्यांना तसेच दुकानदारांना अभिवादन करत पुढे चालले होते. औक्षण करण्यासाठी थांबलेल्या महिला भगिनींकडून मान स्वीकारत तसेच ठिकठिकाणचा सत्कार स्वीकारत, कार्यकर्त्यांच्या गगनभेदी घोषणांमुळे वातावरण उत्साहित झाल्याचे चित्र होते. चौका चौकांमध्ये फटाक्यांच्या माळा लावून व हार घालून नागरिक त्यांचे स्वागत करीत होते. कसबा गणपती, नानावाडा, पासोडया विठोबा येथून मार्गक्रमण करत पदयात्रा नागरिकांचे लक्ष वेधून घेत घेत पुढे चालली होती.
पुणे शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष अॅड. अभय छाजेड, माजी महापौर रजनी त्रिभुवन यांच्यासह महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते पदयात्रेच्या अग्रभागी होते. तांबोळी मस्जिद येथे पदयात्रा पोहोचल्यानंतर धंगेकर यांनी काही प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन मस्जिद येथे जाऊन माथा टेकला. पदयात्रेचे ठिकठिकाणी होणारे स्वागत कार्यकर्ते कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत असल्याचे चित्र होते.
मार्गात येणाऱ्या शितळा देवी मंदिर व सत्यनारायण भगवान मंदिरात जाऊन श्री धंगेकर यांनी दर्शन घेतले. याच परिसरात सुरू असलेल्या एका लग्न सोहळ्याला देखील उमेदवारांनी हजेरी लावून नववधूवरांना शुभाशीर्वाद दिले. शिवसेनेच्या पुणे जिल्हा महिला आघाडीच्या नेत्या तृष्णाताई विश्वासराव, संदीप गायकवाड, विलास कतलकर, स्वाती कतलकर, संतोष भुतकर, शुभम दुगाने, राजेंद्र शिंदे, युवराज पाटील, नागेश खडके, जितेंद्र निजामपूरकर, अश्विनी मल्हारे, अनुपमा महांगडे, गौरी हेंद्रे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सोन्या मारुती चौक, डुल्या मारुती चौक येथील व्यापारी देखील पदयात्रा पाहायला दुकानाच्या बाहेर येत होते. श्री धंगेकर हे वैयक्तिक प्रत्येकाला भेटत व आशीर्वाद घेत पुढे चालले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे वनराज आंदेकर, गणेश नलावडे, दत्ता सागरे, प्रसाद गावडे, राजेंद्र मोरे, राजेंद्र शिंदे, स्वाती कथलकर ,संतोष भुतकर, निलेश राऊत, हनुमंत दगडे तर कसबा कॉंग्रेस ब्लॉक अध्यक्ष प्रवीण करपे, काँग्रेसच्या माजी नगरसेविका लताताई राजगुरू, शहर महिला कॉंग्रेस अध्यक्ष पूजा आनंद, संदीप आटवालकर, मंगेश निरगुडकर, प्रवीण करपे या प्रमुख कार्यकर्त्या. या प्रमुख कार्यकर्त्यांचा घोषणा देण्यात व अभिवादन करण्यात पुढाकार होता.
रात्री आठ वाजता बॉंम्बे वाडा येथे पदयात्रा पोहोचल्यानंतर तेथे समारोप झाला. काँग्रेस पक्षाचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देत “महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे प्रचंड मतांनी विजयी होतील” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.