धिरोदत्त व समर्पित व्यक्तित्व : श्री अशोकराव सराफ


भारताच्या संस्थात्मक जीवनात आपल्या कार्यपद्धतीतून निरंतरपणे काम करत संपूर्ण समाज मनावर आपला ठसा उमटवण्याचे ज्या संस्थांनी वा विचारधारेने काम केले, त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव अग्रभागी येते. आज हा जो विशाल वटवृक्ष उभा आहे त्यात असंख्य कार्यकर्त्यांचे जीवन समर्पित झाले आहे. संगमनेर सारख्या एकेकाळी कम्युनिस्ट विचारधारेचा बालेकिल्ला असणाऱ्या तालुक्यात संघ शाखा रुजवणे व वाढवणे यात अशोकराव सराफ यांचे नाव प्रामुख्याने लक्षात येते.

एका सुखवस्तू कुटुंबात जन्माला येऊन, मोठा व्यवसाय सांभाळत- सांभाळत स्वतःला संघ कामासाठी झोकुन देणारे अशोकरावांचे व्यक्तित्व मी माझी समज आल्यापासून गेली ५५ वर्षे पाहत आहे.

पायजमा, शर्ट, सोनेरी काडीचा चष्मा, राणा प्रतापासारख्या धारदार मिशा, सतत हसतमुख चेहरा असे त्यांचे व्यक्तित्व मी फार जवळून पाहिले आहे. स्वर्गीय दादासाहेब गणपुले- तालुका संघचालक, स्वर्गीय तात्यासाहेब संत- शहर संघचालक, स्वर्गीय बंडोपंत जोशी (शिवाजी प्रिंटिंग प्रेसचे मालक) -तालुका कार्यवाह व अशोकराव सराफ शहर कार्यवाह या समूहाच्या सानिध्यात मुख्यशिक्षक, शाखा कार्यवाह व संगमनेर शहर कार्यवाह अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडण्याचे भाग्य मला लाभले आहे.

अधिक वाचा  साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दर पाच वर्षातून किमान एकदा तरी महिलाध्यक्ष नियुक्त व्हावी अशी तरतूद व्हावी : शरद पवार

कितीही कठीण परिस्थितीत या विचारांचे बीजारोपण समाजात झाले पाहिजे व वाढत राहिले पाहिजे  यासाठी दिवस- रात्र समर्पण भावनेने काम करणे हे व्रत अशोकराव सराफ यांनी अंगीकारलेले आहे.

अनेक मोठमोठ्या योजना व कार्यक्रम त्यांचे पालकत्वात पार पडले. स्वर्गीय बाबाराव भिडे यांनी महाराष्ट्राचे प्रत्येक घरात शिवाजी महाराजांचा संदेश वितरित करून दारा-दारात पोहोचवण्याचा संकल्प केला होता. त्यात संगमनेर तालुक्यात महिनाभर फिरून पूर्ण तालुका पिंजून काढण्याचे काम अशोकराव सराफ यांचे नेतृत्वात झाले. अयोध्येचा शीलापूजन कार्यक्रम असो, राम मंदिरासाठी कारसेवकांना पाठविण्याचे काम असो, संगमनेरातील जातीय दंगलीनंतर पीडित परिवारांना स्वतःचे पायावर उभे राहण्यासाठी मदत गोळा करून जनकल्याण संस्थेच्या माध्यमातून वितरित करण्याचे काम असो, एकात्मता यात्रेनिमित्त गंगापूजन अभियान असो, डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी निमित्त झालेले विविध कार्यक्रम अशा विविध स्तरावर सर्व कार्यक्रम सामुदायिकरित्या पार पाडण्याचे काम अशोकराव सराफ यांचे मार्गदर्शनाखाली झाल्याचे मी पाहिले आहे, अनुभवले आहे.

अधिक वाचा  मान्सूनचे महाराष्ट्रातील आगमन लांबले : कधी होणार आगमन?

सहकार्य उभारण्यात प्रचारकांची भूमिका फार मोठी असते. स्वर्गीय सुमंतराव घायाळ, स्वर्गीय रामुअण्णा दाते, श्री भाऊराव ताथवडेकर, शरदराव कटककर, बाळासाहेब पुराणिक, गोविंदराव लेले अशी अनेक नावे घेता येतील की ज्यांनी नगर जिल्ह्यात व संगमनेरात काम करत असताना त्यांची पित्यासमान पूर्ण काळजी घेण्याचे काम अशोकरावांनी पार पाडलेले आहे.

शांतपणाने, सहजतेने कार्यरत राहणे व स्वतः केलेल्या कामाची चर्चा सुद्धा न करणे, असे पडद्यामागे राहून असंख्य भूमिका गेली ७५ वर्षात अशोकरावांनी संगमनेरात पार पाडल्या आहेत. सामान्य स्वयंसेवकापासून ते संगमनेरचे संघचालक या तर संघाच्या अधिकृत जबाबदाऱ्या होत्याच पण विचार परिवारातील सर्व संस्थांना मार्गदर्शन करून काम यशस्वीपणे पार पाडणे ही त्यांची कार्य कुशलतेची अनेक उदाहरणे आहेत.

माझे व्यक्तिगत जीवनात सुद्धा विद्यार्थी परिषदेचे काम महाराष्ट्रात करतेवेळी किंवा राष्ट्रीय स्तरावर भारतीय जनता पार्टीचे काम करताना अनेक वेळा भूतकाळात संगमनेरच्या कार्यक्षेत्रात अशोकराव सराफ यांचे समवेत काम करण्याचा फायदा मला मिळत असतो.

अधिक वाचा  मुख्यमंत्रीपदासाठी विरोधी विचारसणीच्या लोकांचे त्यांनी तळवे चाटले- अमित शाहंचा उद्धव ठाकरे यांना टोला

कोणतीही अपेक्षा मनात न ठेवता निरपेक्षपणे संसारिक व सामाजिक जबाबदारी सांभाळत असताना थोडाही अहंकाराचा लवलेश लागू न देता, सर्व वयाच्या, विविध समाजाच्या, वेगवेगळ्या स्वभावाच्या, लोकांना समवेत घेऊन आपले काम यशस्वीपणे पार पाडणे. ही त्यांची विलक्षण हातोटी आहे.

संगमनेरातील सर्व संस्था, संघ परिवार एकत्रित येऊन माननीय अशोकराव सराफ यांचे सहस्त्रचंद्रदर्शन कार्यक्रमा निमित्त त्यांचा यथोचित सत्कार सोहळ्याचे आयोजन संगमनेर प्रांत संघचालक नानासाहेब जाधव व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ प्रचारक केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी यांचे उपस्थितीत पार पडत आहे. यातून अनेक कार्यकर्त्यांना निश्चितच प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही. या शुभप्रसंगी मी अशोकरावांसाठी दीर्घआयुरारोग्य चिंतितो.

श्याम जाजू,निवर्तमान राष्ट्रीय उपाध्यक्ष,भारतीय जनता पार्टी, नवी दिल्ली

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love