पुणे – ‘दोषी मीच या समाजाचा, तूच मार्ग दाखव आता’ अशी आर्त विनवणी करून उर्वरित आयुष्यातील वाटचाल सुखकर होऊ दे असे दान कोल्हापूर जिल्हा कारागृहातील (कळंबा) बंदीजनांनी विठुराया चरणी मागितले. निमित्त होते ते भजन आणि अभंग गायन स्पर्धेचे.
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि संस्थेच्या रौप्यमहोत्सवाचे निमित्त साधून कारागृहातील बंदीजनांसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. आज कळंबा कारागृहातील बंदीजनांनी स्पर्धेत सहभाग नोंदवत संतरचना सादर केल्या. कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर, वरीष्ठ तुरुंग अधिकारी एस. एम. कदम, सहायक धर्मादाय आयुक्त श्रीमती कोरे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी, हभप चैतन्यमहाराज, तसेच शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि स्पर्धा प्रमुख लक्ष्मीकांत खाबिया, उपाध्यक्ष नंदकुमार बंड, हभप अच्युत महाराज कुलकर्णी, विश्वस्त विवेक थिटे, संजीव मिसाळ, शंकर धुमाळ आदी उपस्थित होते.
‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ हा संत जनाबाई यांचा अभंग तर ‘सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती’आणि ‘चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू’ हे संत तुकोबारायांचे अभंग बंदीजनांनी मोठ्या भक्तीभावाने सादर केले. स्पर्धेत स्वरचित रचना सादर करण्यासाठी पश्चाताप, प्रामाणिकपणा, समाजसेवा असे विषय देण्यात आले होते. त्याला अनुसरून बंदीजन योगेश चांदणे रचित ‘दोषी मीच या समाजाचा, तूच मार्ग दाखव आता’ ही रचना सादर करण्यात आली.
उर्वरित आयुष्यात नवीन मार्ग अवलंबतील
मानवाचे कल्याण करणे हे एकच ध्येय जगत् गुरू तुकाराम महाराज यांचे होते. कारागृहातील बंदीजनांसाठी आयोजित केलेल्या श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धेमुळे बंदीजनांना कारागृहातून बाहेर गेल्यानंतर नवीन मार्ग सापडेल, अशी खात्री आहे.
– चंद्रमणी इंदूरकर, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर
संत वचनाचा अवलंब करा
हातून एखादी चूक झाली तर आयुष्य संपते असे नाही. झालेल्या चुकीबद्दल प्रायश्चित घेऊन भविष्यातील वाटचाल योग्य पद्धतीने करता येते. ‘आतां तरी पुढें हाचि उपदेश, नका करूं नाश आयुष्याचा’ या जगद् गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या वचनाचा अवलंब करावा.
हभप चैतन्यमहाराज
बंदीजनांच्या मानसिकतेत बदल होईल
स्पर्धेच्या माध्यमातून बंदीजनांना परमेश्वराची सेवा करण्याची संधी मिळाली आहे, याचे शब्दात वर्णन करता येणार नाही. कारागृहाच्या बोधचिन्हात बंदीजनांची सुधारणा, त्यांचे पुनर्वसन असा उल्लेख आहे. स्पर्धेमुळे बंदीजनांच्या मानसिकतेत बदल निश्चित बदल होईल, भविष्यात योग्य पद्धतीने बंदीजनांचे पुनर्वसनही नक्कीच होईल.
– जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला बंदीजन
महाअंतिम फेरीत प्रथम क्रमांक पटकाविणार्या संघास ज्ञानोबा-तुकाराम महाकरंडक आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाकरंडक आणि प्रमाणपत्र तर तृतीय क्रमांकास संत शेख महंमद महाकरंडक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धकांना आणि स्पर्धक संघांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ संघांना साहित्यभेट
स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल कारागृहातील संघांला सौ. दिना आणि प्रकाश धारीवाल यांच्या वतीने स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ हार्मोनियम, तबला, पखवाज, 10 जोडी टाळ, तुकोबांच्या अभंगाची पाच फूट बाय पाच फूट आकाराची फे्रम व प्रबोधनात्मक तसेच प्रेरणायादी 82 पुस्तकांचा संच देण्यात आला.