पुणे – आरोप जरुर करावेत, पण या देशात यंत्रणा आहे. तुम्ही सरकारकडे जा, न्यायालयात जा पण इतक्या वेळा पत्रकार परिषद घेऊन रोज नव्याने आरोप करण्याचा हा ट्रेंड आला आहे. टीव्ही मालिकेच्या जाहिरातीप्रमाणे ते सुरु आहे. हे दुर्देवी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात असं कधी झालेलं नाही, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांच्या पाणीप्रश्न तसेच टॅक्स प्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
भाजपा नेते किरीट सोमय्या हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारवर सातत्याने करीत असलेल्या आरोपांबद्दल बोलताना सुळे म्हणाल्या, सोमैय्या वारंवार आरोप करत आहे. ते रोज नवीन एक आरोप करत असतात. तो समजत नाही, तोवर ते दुसरा आरोप करतात. त्याचे आरोप हे रॅपिड रिडींग सारखे झालेले आहे, असा खोचक टोलाही त्यांनी सोमैयांना लगावला. तसेच चंद्रकांत पाटील यांच्या १० मार्च पर्यंत राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल, या वक्तव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली, अजून १० मार्च यायला खूप वेळ आहे, असं त्या म्हणाल्या.
मुंबईत ईडीकडून धाडी सुरु असून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत दबाव आणला जात आहे का? असं विचारलं असता त्या म्हणाल्या, “मी संसदेतही या विषयावर बोलले आहे. केंद्र सरकार सातत्याने इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआयचा गैरवापर करत आहे. विरोधी पक्षातच या नोटीस कशा येतात याचा सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. विरोधात असताना येणाऱ्या नोटीशी भाजपात गेलात की कुठे जातात ते देवाला माहित. ही दडपशाही असून सातत्याने लोकांना केंद्र सरकार घाबरवत आहे”.
गुजरातमधील बँक घोटाळ्यासंबंधी बोलताना त्यांनी म्हटलं की, “या देशात कोणत्याही राज्यात झालेल्या घोटाळ्याची जबाबदारी केंद्राने घेतली पाहिजे. सात वर्षांपासून यांचंच सरकार देशात असताना मग काय करत होते? याची व्यापक चर्चा संसदेत करणार आहोत”.
पुणे महापालिकेच्या प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. स्वबळावर निवडणूक लढवायची की आघाडी करून निवडणूक लढवायची याबाबतचा निर्णय हे अजित पवार घेतील आणि ते कार्यकर्त्यांशी याबाबत बोलतील आणि ठरवतील, असंही त्या म्हणाल्या.
हिजाब प्रकरणाबाबत बोलताना त्या म्हणाल्या, कोण काय कपडे घालणार, हे कोण ठरवणार? आम्ही पुरुषांना विचारतो, का तुम्ही टोपी का घातली, जॅकेट का घातला. मग तुम्ही आम्हाला का विचारता? काय घालायचं हा अधिकार आमचा आहे, आम्ही ठरवू काय घालायचं .