पुणे(प्रतिनिधी)– अण्णाभाऊ साठे यांच्यावरील पुस्तके इतर भाषेत भाषांतरित करण्याची गरज आहे. तर अण्णाभाऊंना ‘भारतरत्न’ देण्याबाबतची जबाबदारी शरद पवार यांनी घ्यावी. पवारसाहेब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अनेक कामे करून घेऊ शकतात. मी शरद पवारांसोबत असेन, असे मत भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी सोमवारी व्यक्त केले. तर अण्णाभाऊंना भारतरत्न हा किताब सरकारकडून मिळण्यासाठी मी विशेष प्रयत्न करेन, अशी ग्वाही या वेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली.
विश्वास पाटील यांनी लिहीलेल्या अण्णा भाऊ साठे यांच्यावरील ‘अण्णा भाऊ दि अपहोल्डर दलित ऍन्ड विमेन लिटरेचर’ या चरित्र ग्रंथाचा इंग्रजी आणि हिंदी अनुवाद असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब कसबे, खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, भगवानराव वैराट आदी उपस्थित होते.
तावडे म्हणाले, कार्यक्रमाला येण्याची इच्छा सुरुवातीपासूनच होती. मात्र, आता निवडणुकांचे दिवस जवळ आले आहेत. या कार्यक्रमाला येण्याआधी माझ्या मनात साशंकता होती. कारण एकीकडे रावसाहेब कसबे ते विशिष्ट झोत टाकणार, पवारसाहेब विशिष्ट झोत टाकणार, त्या झोताचा प्रकाश कुठे पडलाय, ते शोधण्याताच सगळयांचा वेळ जातो, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.
पूर्वी महाराष्ट्राचे राजकारण प्रगल्भ होते. आम्ही पूर्वी टीका केली तर एकत्र जेवायला बसायचो. मात्र, आता तसे चित्र दिसत नाही. मी विरोधी पक्षनेता असताना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, सुनील तटकरे अशा सर्वांवर सडतोड टीका करायचो. पण, जेवणाच्या सुट्टीच्या वेळी विलासराव देशमुख यांची चिट्ठी माझ्याकडे यायची. माझ्याकडे जेवायला या. तटकरे माझ्या केबिनमध्ये जेवायला यायचे, अशी आठवणही तावडे यांनी या वेळी सांगितली.
अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेन : पवार
पवार म्हणाले, अण्णाभाऊंचे वादळी जीवन आणि वैश्विक दर्जाचे लेखन लक्षात घेऊन त्यांना केंद्र सरकारने भारतरत्न हा किताब मिळण्यासाठी मी विशेष प्रयत्न करेन. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सातारा आणि कराड येथील स्वातंत्र्यसैनिकांचे मोठे योगदान आहे. अण्णाभाऊंनीदेखील स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान मोठे आहे. त्यांनी लिहिलेली छक्कड ‘माझी मैना गावावर राहिली’ ही आजदेखील प्रत्येकाला प्रेरणा देते.