पुणे- ममता बॅनर्जी या भाजपला नाही तर काँग्रेसला विरोध करत आहेत. 2024 मध्ये जी निवडणूक होणार आहे ती एक निर्णायक निवडणूक असेल. त्या निवडणुकीत मोदींचा पराभव केला नाही तर, देशाची लोकशाही अस्तित्वात राहणार नाही. देशाच्या लोकशाहीला गंभीर धोका आहे, असं मत काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. दासरम्यान, काँग्रेस शिवाय कोणतीही आघाडी होऊच शकत नाही. अशी आघाडी झाल्यास तिला यश मिळणार नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
1971 च्या भारत – पाकिस्तान युद्धातील भारताच्या विजयाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांच्यातर्फे पुणे शहरातील नामवंत 25 चित्रकारांनी ‘स्वर्गीय इंदिरा गांधी आणि 1971 चे युद्ध’) या विषयावर पेंटिंग्स काढले आहेत. त्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला चव्हाण उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर लेफ्टनंट जनरल एस. एस. मेहेता, निवृत्त ब्रिग्रेडीयर अजित आपटे आदी मान्यवर उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, राजकारणात राजकीय महत्त्वकांक्षा ठेवणं गैर नाही. पण बेकीचं वातावरण करून विरोधकांची एकजूट तोडण्याचा प्रयत्न करू नये. ममता बॅनर्जी ह्या बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. त्या देशाच्या नेत्या आहेत. त्यांना स्वतंत्र विचार मांडण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. त्या ज्या पद्धतीने महत्त्वकांक्षा बाळगत आहेत त्यात काही गैर नाही. ममता बॅनर्जी यांनी मोदींबद्दल एकही शब्द काढला नाही. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की, त्या एकेकाळी भाजप बरोबर होत्या. आज त्या बोलत आहेत की, त्या भाजपला विरोध करतात तर, त्या भाजपला नाही तर काँग्रेसला विरोध करत आहेत.परंतु मोदींनी पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची एकजूट झाली पाहिजे. त्या एकजुटीत त्यांनी कुठेतरी बेकीच वातावरण निर्माण करु नये. ती एकजूट तोडण्याचा प्रयत्न करु नये, असं चव्हाण म्हणाले.
काँग्रेसशिवाय कोणत्याही प्रकारची महाआघाडी होऊच शकत नाही. जर झाली तर ती यशस्वी ठरणार नाही. त्यामुळे राजकीय महत्त्वकांक्षा असण गैर नाही. त्यांना पंतप्रधान व्हायचं असेल त्यांनी पहिल्यांदा निवडणुका जिंकल्या पाहिजे. निवडणुका जिंकल्यानंतर जे चित्र निर्माण होईल, त्यानंतर नेते पुढचा निर्णय घेतील. पण स्वतःच्या महत्वकांक्षा पुढे आल्यातर काही निष्पन्न होणार नाही, असं सांगतानाच तरी सर्व विरोधी पक्षांची एकजूट होईल ही आशा आहे, असं त्यांनी सांगितलं.
लोकसभा निवडणुकीत कोण एकत्र येईल, कोण त्याच नेतृत्व करेल हे नंतर ठरेल. त्यासाठी आधी पाच राज्यात होणाऱ्या निवडणुका लढवाव्या लागेल. तिथं मोदींना रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. नंतर 2024ची निवडणूक होईल. त्या कालावधीत ही सर्व आघाडी एकत्र करावी लागेल. तोपर्यंत एकदिलाने मोदींच्या कारभारावर टीका केली पाहिजे. त्यांचा कारभार उघड केला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.
भारताचे दरडोई उत्पन्न बांगलादेशपेक्षा कमी
1971 च्या युद्धाला आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत. 7 डिसेंबर 1971 ते 16 डिसेंबर 1971 या 13 दिवसाच्या कालावधीत हे युद्ध झाले. या 13 दिवसांत पाकिस्तानचा निर्णायक पराभव करत बांगलादेशची निर्मिती करण्यात आली. ज्या बांगलादेशची निर्मिती आपण केली त्या बंगलादेशाचं दरडोई उत्पन्न आज भारतापेक्षा जास्त आहे. कोरोना काळात किंवा त्याआधी देशाची अर्थव्यवस्था ज्या पद्धतीने हाताळण्यात आली, त्यामुळे अर्थव्यवस्था खूप अधोगतीला लागली आहे. विकासदर हा खूप घटला आहे. अर्थव्यवस्था सांभाळण्यात सरकारला अपयश आलेलं आहे. हे लवकरच दुरुस्त केलं पाहिजे. आज भारत महासत्ता बनण्याचं स्वप्न पाहत आहे. पण त्यासाठी अर्थव्यवस्था ही खूप महत्त्वाची आहे. दहशतवादी कारवाया कमी करण्यासाठी नोटबंदी करण्यात आली. मात्र, देशात अजूनही आतंकवादी कारवाया कमी झालेल्या नाहीत, असं देखील चव्हाण यावेळी म्हणाले.