पुणेः- विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांततर्फे रविवार दिनांक 14 नोव्हेंबर 2021 रोजी ‘मेळा गोभक्तांचा’ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मेळ्यामध्ये सुंपूर्ण महाराष्ट्रातून पाचशे गोप्रेमी, गोपालक, गोरक्षक, सहभागी होणार आहेत.
यानिमित्त आदर्श गोभक्त, आदर्श गोपालक, आदर्श गोशाळा चालक, आदर्श गोरक्षक पुरस्कार देण्यात येणार आहेत, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या आत्मनिर्भर भारत अभियानाचे प्रमुख माधव कुलकर्णी, विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष आणि गोभक्त मेळाव्याचे संयोजक सीए महेंद्र देवी आणि विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत मंत्री संजय मुद्राळे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
आत्मनिर्भर भारत अभियांनांतर्गत आयोजित हा कार्यक्रम रविवार दिनांक 14 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 4.00 (चार) वाजता, लेडी रमाबाई हॉल, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, टिळक रस्ता, सदाशिव पेठ पुणे येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते गोपूजन होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक कृष्णकुमार गोयल भूषविणार असून या कार्यक्रमाला साध्वी प्रीती सुधाजी महाराज आणि स्वरसम्राज्ञी मधुस्मिताजी यांचे आशिर्वचन प्राप्त होणार आहेत. आचार्य गोविंददेव गिरीजी महाराज यांचे कृपापात्र शिष्य धर्माचार्य शंतनु रिठे महाराज आणि आत्मनिर्भर भारत योजनेचे महाराष्ट्र प्रमुख माधव भांडारी यांचे मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गोरक्षा आंदोलन चालवणारे विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शंकररावजी गायकर यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. महापौर मुरलीधीर मोहोळ यांची सन्माननीय उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे.
या कार्यक्रमाला पांजरापोळ भोसरीचे प्रमुख ओमप्रकाश रांका, महाएनजीओ फेडरेशनचे संस्थापक आणि आर्ट ऑफ लिव्हिंग महाराष्ट्रचे विश्वस्त शेखर मुंदडा, इस्कॉन पुणेचे प्रमुख प्रभू श्वेतप्रदीपदास महाराज, पतंजलीचे महाराष्ट्र समिती प्रमुख बापू पाडळकर, गोविज्ञान संशोधन संस्थेचे प्रमुख राजेंद्र लुंकड, सामाजिक कार्यकर्त्या अनिता तलाठी, शि.प्र. मंडळ पुणेचे अध्यक्ष एड. नंदू फडके, माजी विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, सामाजिक कार्यकर्ते मोहन बागमार, राष्ट्रीय गोसंवर्धन परिषदेचे संयोजक विजय वरुडकर यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे,
गोरक्षण आणि गोसंवर्धन यातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी समाज जागृती व्हावी, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे पाचशे गोभक्त, गोप्रेमी, गोपालक, गोरक्षक, गोसंवर्धक, गोशाळाचालक, गोप्रचारक, पंचगव्य साहित्य उत्पादक आणि वैद्य सहभागी होणार आहेत. यावेळी गोशाळा उभारणी, सेंद्रीय खते, गो उत्पादने यांसदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.