पुणे-ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्दयावर महाराष्ट्रात भाजपाने चक्काजाम आंदोलनाची हाक दिलेली असताना दुसरीकडे ओबीसी नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांना ओबीसी समाजाचे नेतृत्व करण्याची ऑफर दिली आहे. पक्ष कोणता आहे, याविषयी काही फरक पडत नाही. जो-जो ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी भांडतोय, त्यांचे आम्ही स्वागत करतो. देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाचे नेतृत्व करावे, सर्व श्रेय त्यांनी घ्यावे, पण आमचे आरक्षण वाचवावे. असे मी त्यांना म्हटलो आहे, असा गौप्यस्फोटही भुजबळ यांनी शनिवारी येथे केला.
लोणावळ्यात सुरू असलेल्या ओबीसी व्हीजेएनटी न्याय हक्क समितीच्या चिंतन शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, माणिकराव ठाकरे, बबनराव ढाकणे, नारायण मुंडे, बाळासाहेब सानप, ईश्वर बाळबुधे, अरुण खरमाटे, साधना राठोड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
भुजबळ म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी 2019 साली काढलेल्या अध्यादेशावर सही झाली असती, तर आरक्षण टिकले असते, असे जर कोणी म्हणत असेल, तर ते साफ खोटे आहे. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधिशांच्या समितीने 2010 साली लागू केलेल्या अटीचा समावेश नव्हता. देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडीवर खोटे आरोप करून समाजाची दिशाभूल करू नये. 2010 सालापासून या विषयाला सुरूवात झाली. 2016 साला देशातील सर्व ओबीसींचा इम्पिरिकल डाटा गोळा करून केंद्राकडे देण्यात आला. त्यावेळी केंद्रात मोदी व राज्यात फडणवीस सरकार होते. असे असताना फडणवीसांनी पाच वर्षात तो डाटा केंद्रांकडून घेऊन न्यायालयात का सादर केला नाही? अथवा राज्याचा वेगळा डाटा पुन्हा का गोळा केला नाही? 2019 साली खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नीती आयोगाला पत्र लिहत तो डाटा मागितला. त्यावेळच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनीदेखील तो मागितला. मात्र केंद्राकडून तो देण्यात आला नाही. आता आमचे सरकार येऊन पंधरा महिने झाले, असा आरोप केला जात आहे. पण आमचा कालावधी कोरोनात गेलाय, घरोघरी जाऊन डाटा कसा गोळा करणार, केंद्राचीदेखील 2021 ची जनगणना जून सुरू झालेली नाही. ज्यांच्याकडे समाजाचा डाटा आहे, ते केंद्र सरकार तो आम्हाला द्यायला तयार नाहीत. केंद्रात भाजपाचे सरकार असल्याने मी देवेंद्र फडणवीस यांना ओबीसी समाजाचे नेतृत्व करण्याची ऑफर दिली आहे. त्यांनी केंद्राकडून तो डाटा आणून द्यावा. आरक्षणाचे सर्व श्रेय त्यांनी घ्यावे. पण समाजाचे आरक्षण टिकवावे, असे म्हटलो आहे, असेही त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाला पाठींबाच
मराठा आरक्षणावर बोलताना माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, मी फक्त ओबीसी अथवा इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे,असे म्हटलो आहे. माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही, असेही त्यांनी नमूद केले.