पुणे : काँग्रेसचे खासदार आणि गुजरातचे प्रभारी राजीव सातव यांचे आज (रविवार) कोरोनाने दुख:द निधन झाले. गेल्या काजी दिवसांपासून कोरोनाशी झुंज देत असलेल्या सातव यांची झुंज अपयशी ठरल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
9 एप्रिलला सातव यांना कोरोनाची लक्षणे जाणवली होती. त्यानंतर 23 एप्रिलपासून त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. दरम्यान इतके दिवस त्यांची प्रकृती सुधारत असतानाच शुक्रवारी सातव यांना पुन्हा त्रास झाला आणि त्यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली.त्यामुळे काँग्रेसच्या गटातून चिंता व्यक्त केली जात होती. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी रुग्णालयातील उपचार करणाऱ्या डॉक्टरांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमध्यमांशी बोलताना सातव यांची प्रकृती सर्वसाधारण होत असताना त्यांना पुन्हा त्रास झाला परंतु ते लवकरच पुन्हा लवकर बरे होतील असा विश्वास व्यक्त केला होतां.
एप्रिल महिन्यात खासदार राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अखेर उपचाराअंती 10 मे रोजी त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे लवकरच राजीव सातव यांना रुग्ण्यालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती. पण, अचानक राजीव सातव यांची प्रकृती खालावली. त्यांना न्युमोनियाचा संसर्ग झाल्याने पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. राजीव सातव यांच्यावर जहांगीर हॉस्पिटलमध्ये गेल्या 23 दिवसांपासून उपचार सुरू .
स्वतः राहुल गांधी राजीव सातव यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी जहांगीर रुग्णालयातील डॉक्टरांना फोन करून सातव यांच्या प्रकृतीविषयी माहिती जाणून घेतली होती. तर, दुसरीकडे काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही जहांगीर हॉस्पिटलमध्ये येऊन सातव यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेत होते.
कोण होते राजीव सातव?
45 वर्षीय राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी होते, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक होते.. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव 2014 मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते.
राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं.
चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्कार
हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. संसदेत 1075 प्रश्न विचारत 205 वादविवादांमध्ये सातव सहभागी झाले होते. राजीव सातव यांची 81 टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
राज्यसभेवर वर्णी
राजीव सातव यांनी स्वतःहून 2019 मधील लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र गेल्या वर्षी झालेल्या राज्यसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून सातव यांची खासदारपदी वर्णी लागली होती