भाजपचे आता ‘मिशन महाराष्ट्र’?-फडणवीस घेणार मोदींची भेट


नवी दिल्ली (ऑनलाईन टीम)- विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. १७ जुलै) दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर उद्या (शनिवार दि. १८ जुलै) ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आलेले आहे. महाविकास आघाडीत कुठलेही मतभेद नाहीत असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि आघाडीतील अन्य पक्षाचे नेते सांगत आले तरी महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल नाही, हे अनेक वेळा निदर्शनास आले आहे. मध्यप्रदेश, राजस्थान नंतर आता मिशन महाराष्ट्राची चर्चा फडणवीस यांच्या हायकमांडच्या  अचानक भेटीमुळे राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राज्यातील कोरोनाची परिस्थिती, साखर उद्योगाचे प्रश्न याबाबत ही भेट असल्याचे फडणवीस सांगत असले तरी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पक्षाचे खासदार रणजीतसिंह निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे पूर्वाश्रमीचे कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे नेते दिल्लीत पोहचले आहेत. त्यामुळे भाजपच्या ‘मिशन महाराष्ट्र’च्या चर्चेला उधान आले आहे.

अधिक वाचा  उद्धव ठाकरे व अजित पवार सपशेल अपयशी ठरले

ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट या दोन नेत्यांच्या बंडानंतर काँग्रेसला हादरे बसले आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत अनेक असंतुष्ट नेते आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तेची बांधणी सुरू असतांनाच अजित पवारांनी भाजपशी दोस्ती करत सत्ता स्थापन करणं यामुळे खळबळ उडाली होती. नंतर ते बंड शांत झालं असलं तरी अजूनही सर्व काही अलबेल आहे असे नाही.

फडणवीस यांची भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीत निवड होणार?

फडणवीस यांची भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीत निवड होणार आहे, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. व्यंकय्या नायडू हे उपराष्ट्रपती झाल्याने, तसंच सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि अनंतकुमार यांचं निधन झाल्यामुळे पक्षाच्या संसदीय समितीत चार जागा रिक्त झाल्या आहेत. त्यात एका जागी फडणवीस यांची वर्णी लागेल अशी चर्चा आहे. या सगळ्या विषयांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या दौऱ्याकडे सगळ्यांचं विशेष लक्ष आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love