मुंबई – राज्यात संचारबंदी आणि इतर निर्बंध लावूनही कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने आता राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी याला दुजोरा दिला आहे. दरम्यान, लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या करणार आहेत असे एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांसही बोलताना सांगितले.
राज्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध घालण्यासाठी ‘ब्रेक दि चेन’चा नारा देण्यात आला. त्यानंतर राज्यात संचारबंदी आणि विकेंड लॉकडाऊन करण्यात आला. परंतु, हे करूनही पाहिजे तसा फरक पडलेला नाही. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतीच आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडला आहे. दुसरीकडे रुग्णांना बेड,ऑक्सीजन,रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल होत आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.
”राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आकडे कमी करण्यासाठी कठोर निर्बंध आवश्यक आहेत. कडक लॉकडाऊन हवा, ही जनतेची भावना आहे. उपचार मिळत नाहीत, ऑक्सिजन नाही, परराज्यातून ऑक्सिजन आणावा लागत आहे. ही चेन ब्रेक करण्यासाठी कठोर निर्बंध हवेत. ऑक्सिजन प्लाँट उभारून हवेतील ऑक्सिजन कामी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे असे सांगून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्या लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करतील”, असे सांगितले.