पुणे—औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. या मुद्यावरून राज्यातील महाविकास आघाडीतही मतभेद निर्माण झाले आहे. शिवसेनेने औरंगाबादच्या नामांतराचा आग्रह धरला असताना कॉंग्रेसने मात्र त्याला विरोध केला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांनी किमान समान कार्यक्रमावर हे सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे शिवसेनेने आपला अजंटा राबवू नये असे कॉंग्रेसचे म्हणणे आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीने मात्र, सावध भूमिका घेतल्याचे दिसते आहे.
पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा याच मुद्द्यावरून बोलताना राज्यामध्ये नामांतराशिवाय इतरही प्रश्न आहेत असे सांगत आता कोरोना, त्यावरील लस याविषयी काम करण्याची आवश्यकता आहे असं वक्तव्य केलं. औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न महाविकास आघाडी एकत्रित बसवून सोडवेल असेही अजितदादा यांनी यावेळी स्पष्ट केले.