पुणे(प्रतिनिधी)—पुण्यातील औंध भागातील एका सोसायटीमध्ये काही दिवसांपूर्वी रात्री चोर शिरले होते. या सोसायटीतील रहिवाश्याला याची चाहूल लागल्यानंतर त्याने पोलिसांना फोन करून याची कल्पना दिली. रात्रीच्या गस्तीवर असलेले दोन पोलीस त्या सोसायटीमध्ये एकाच दुचाकी वाहनावर आले. ते सोसायटीच्या प्रवेशद्वारावर पोहोचलेले असतानाच नेमके त्याचवेळी चार चोर सोसायटीमधून बाहेर पडत होत. त्यांच्या हातात हत्यारे होती. आलेल्या दोन्ही पोलिसांनी या चोरांना पकडण्याऐवजी स्वत:च तेथून धूम ठोकली. हे प्रकरण चांगलेच गाजले. त्यानंतर पोलीस खात्यावर टीका होऊ लागल्याने या दोन पोलिसांना पोलीस आयुक्तांनी निलंबित केले. परंतु, पोलिसांची जी अब्रू जायची ते गेलीच.
याबाबत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आज पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलतांना नाराजी व्यक्त केली. अजित पवार म्हणाले की, “करोना काळात केलेल्या कामामुळे पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे. मात्र याच प्रतिमेला छेद देणारी दुर्दैवी घटना पुणे शहरात घडली. चोरांना घाबरून रात्री गस्तीवर असलेले दोन पोलीस पळून गेले असल्याची घटना सीसीटीव्हीमधून उजेडात आली. चोर आले म्हणून पोलिसच पळतात ही केविलवाणी गोष्ट आहे. पोलिसांना बघून चोरांनी पळलं पाहिजे. उलट चोरांना बघून पोलीस पळतात हे असं करता कामा नये. त्या दोघांवर कारवाई केली. परंतु अश्या घटनांमुळे पोलिसांची प्रतिमा समाजात खराब होते”.
पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. शहरातील गुन्हेगारी बंद झाली पाहिजे. तसंच वाहनांच्या तोडफोडीच्या घटना घडत आहेत, सामान्य नागरिकांचे नुकसान झाले. त्यात त्यांचा काय दोष? गुंडांकडून होणारा त्रास थांबला पाहिजे असं अजित पवार म्हणाले.