पुणे (प्रतिनिधी) :- मेव्हण्याने आपल्या अल्पवयीन मेव्हणीचे अपहरण केल्याचा गुन्हा पुण्याच्या सिंहगड रोड परिसरात दाखल झाला आहे.अरुण संजय काळे (वय 24 )असे आरोपीचे नाव असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरण झालेल्या मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण करण्यात आलेल्या मुलीचा आणि आरोपीच्या सासूचा भाजीविक्रीचा व्यवसाय आहे. त्यांना एकूण चार मुली असून त्यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. या चार मुलीपैकी मोठ्या मुलीचे लग्न आरोपी अरुण संजय काळे याच्याशी झाले आहे. त्याला दोन मुले आहेत.अल्पवयीन मुलीच्या आईने जावयाविरुद्ध फिर्याद दिली आहे. मुलीच्या आईचा भाजी विक्रीचा व्यवसाय असल्याने त्यांना मार्केटमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी दररोज मार्केट यार्डात जावे लागते. आठ दिवसांपूर्वी त्या पहाटेच्या सुमारास भाजी खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. घरामध्ये मुली असल्याने त्या नेहमी बाहेरून कुलूप लावून जात. त्याप्रमाणे घटना घडली त्यादिवशीही कुलूप लाऊन गेल्या होत्या. मात्र आरोपी अरुण याला सासू बाई बाहेर गेल्याचे दिसताच. त्याच्या जवळ असलेल्या चावीने घराचे दार उघडले आणि 17 वर्षीय मेव्हणीला बाहेर बोलवून घेऊन गेला. त्यानंतर फिर्यादी आई जेव्हा घरी परत आल्या तेव्हा त्यांना त्यांची मुलगी घरात न दिसल्याने त्यांनी आजूबाजूला चौकशी केली तसेच शोध घेतला परंतु त्यांना त्यांची मुलगी सापडली नाही.
मुलगी आज नाही तर उद्या येईल असे वाटले. मात्र ती आलीच नाही. त्यामुळे अखेर त्यांनी जावया विरोधात तक्रार दिली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सिंहगड ठाण्याचे उपनिरीक्षक अमोल काळे करत आहेत.