पुणे- पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेला औद्योगिक परिसराचा विकास करण्यास येत नसेल तर औद्योगिक परिसर एमआयडीसी विभागाला हस्तांतरीत करावा अशी मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी केली आहे.
महाराष्ट्र सरकार एमआयडीसी परिसर निर्मिती करते परंतु त्याच्या मूलभूत सुविधांकडे अजिबात लक्ष देत नसल्याचा आरोप भोर यांनी केला. गेली 40 ते 45 वर्ष महानगरपालिकेला औद्योगिक परिसरातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत आहे परंतु पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आतापर्यंत औद्योगिक परिसराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
जकातीच्या माध्यमातून साडेतीनशे ते चारशे कोटी रुपये उत्पन्न महानगरपालिकेला कित्येक वर्ष मिळत होते आणि सध्या पण कर स्वरूपात कोट्यवधींचा कर महानगरपालिका घेत असते परंतु उद्योजकांना कोणत्याही मूलभूत सुविधा अद्याप देऊ शकत नाहीत, त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे स्वतंत्र औद्योगिक महानगरपालिका स्थापन करण्याची मागणी फोरम स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनमार्फत मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब असताना करण्यात आली होती व तिला मंजुरी सुद्धा मिळाली होती.परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये पुन्हा एकदा ते लांबणीवर पाडण्यात आले.
पिंपरी चिंचवड शहरात अनेक नामांकित उद्योग एमआयडीसी परिसरात आहेत.परिसरात देशी विदेशी अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी भेटी देत असतात परंतु औद्योगिक परिसराला कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे परिसरात अनेक काम गोष्टींची कमतरता जाणवते एकतर उद्योजकांना मूलभूत सुविधा द्या अन्यथा उद्योजकांकडून टॅक्स घेऊ नका.अन्यथा उद्योजकांचे मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी दिला