पुणे(प्रतिनिधी)—आई वडील अंध आणि घरात एकटीच कमावती त्यात कोरोनाचे संकट. त्यामुळे काम नाही म्हणून परिस्थितीला कंटाळून पुण्यातील कलाकार,नृत्यांगना विशाखा काळे यांनी अवघ्या २१ व्या वर्षी आत्महत्या केली. प्रसिद्ध लोककलावंत आणि नृत्यांगना प्रियंका काळे यांची त्या बहिण होत्या.
प्रसिद्ध निर्माते मनोज माझिरे यांच्या महाराष्ट्राची गौरव गाथा, महाराष्ट्राची लोकधारा, अरुण गायकवाड यांच्या गर्जा महाराष्ट्र, आई जिजाऊंची मालिका, लावणी कार्यक्रम आदी कार्यक्रमात काम करत होत्या. राज्यात आत्तापर्यंत ६ कलाकारांनी आत्महत्त्या केली आहे.
कोरोना महामारीने गेले सहा महिने कुठलेच काम नसल्याने आणि घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने काळे यांनी आपला जीवन प्रवास संपवला. वैकुंठ स्मशानभूमी येथे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांना शेवटचा निरोप देण्यात आला. पाच सहा महिने काम नसल्याने कलाकार आता तुटून गेले आहेत. जगावं की मरावं हा प्रश्न त्यांना भेडसावतोय. शासनाने कलाकारांच्या गंभीर परिस्थितीचा विचार करून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा रोज अशा आत्महत्या व्हायला सुरुवात होईल अशा प्रतिक्रिया कलाकारांनी व्यक्त केल्या.