पुणे- पुण्यातील महंमदवाडी येथे रविवारी पहाटेच्या सुमारास १० गायींची कत्तल करण्यात आली असून, गोरक्षक टीम व कोंढवा पोलिसांनी पहाटे छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला. दोन आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे. सामाजीक कार्यकर्ते राजेंद्र भिंताडे व त्यांच्या सहकार्यांनी पोलिस व गोरक्षक पथकाला यावेळी महत्वाची मदत केली.
मिळालेल्या माहितीनुसार उंड्री कडनगर पेट्रोल पंपासमोर महंमदवाडी हद्दीतील मोकळ्या जागेतील एका बंद शेडमध्ये गायी, म्हशी व अन्य जनावरांची कत्तल केली जाणार असल्याची बातमी गोरक्षक सादिब मुलाणी, रुषीकेश कामठे यांच्या टीमला बातमीदाराकडून बातमी मिळाली होती. पहाटे ३ वाजल्या पासून कोंढवा पोलिस ठाण्याचे पीएसआय चव्हाण व गोरक्षक टीम यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली होती. अखेर एका बंद शेडमध्ये गायी व अन्य जनावरांची कत्तल करताना आरोपींवर छापा टाकण्यात आला. यावेळी दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. अन्य आरोपी पळून गेले त्यांचा शोध कोंढवा पोलिस घेत आहेत.
कोंढवा पोलिसांनी ही घटना स्थानिक सामाजीक कार्यकर्ते राजेंद्र भिंताडे यांना कळवली. सदर ठिकाणी पडलेले जनावरांचे मांस उचलण्यासाठी राजेंद्र भिंताडे, प्रभाग अध्यक्ष हनुमंत घुले यांनी जेसीबी व अन्य सामुग्री देवून पोलिस पथक व गोरक्षक टीमला मोलाची मदत केली. वरिष्ठ पोलिस निरिक्षक विनायक गायकवाड, गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय निलेश चव्हाण बिंदूकडे,पोलीस नाईक दिगंबर पाटोळे पोलीस शिपाई चेतन वाघमारे पोलीस शिपाई अतुल शिरसाट दादा लोंढे आधिक तपास करत आहेत.