१०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आळंदीत नांदी संमेलन – साहित्यनिष्ठांची मांदियाळी २९ रोजी

नांदी साहित्य संमेलन आळंदी
नांदी साहित्य संमेलन आळंदी

पुणे(प्रतिनिधी)-’माझा मराठीची बोलु कौतुकें, परि अमृतातेंहि पैजां जिंके’ या ओवीचा प्रत्यय देणारे, ६९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आठवणींना उजाळा देणारे आणि १००व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची नांदी ठरणारे ’साहित्यनिष्ठांची मांदियाळी’ गुरुवार,  दि. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वा. आळंदी देवाची येथील फ्रूटवाले धर्मशाळेत होणार आहे.

यामध्ये ग्रंथदिंडी व ग्रंथपूजनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाच्या महासचिव प्रा. स्वाती चाटे व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी मसापचे जिल्हा प्रमुख राजन लाखे, प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये व समन्वयक डॉ. महेश थोरवे उपस्थित होते.

प्रा. स्वाती चाटे म्हणाल्या, पुण्यामध्ये जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे. या ऐतिहासिक १०० व्या संमेलनाचे निमंत्रण राज्यभरातील रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि साहित्य चळवळीला गती देण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे पूर्वतयारी म्हणून विविध शहरांमध्ये ‘नांदी संमेलने’ आयोजित केली जात आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून, एमआयटी  संस्था आणि ‘श्री क्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी येथील ‘फुटवाले धर्मशाळा’ येथे ‘संत साहित्य’ या मध्यवर्ती विषयावर आधारित एकदिवसीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

त्या पुढेम्हणाल्या, आळंदीमध्ये १९९६ साली एमआयटी आणि आळंदी देहू परिसर विकास समितीच्या माध्यमातून डॉ. विश्वनाथ कराड यांच्या पुढाकाराने ६९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अत्यंत अभूतपूर्व रीतीने पार पडले होते. सामान्यतः तीन दिवसांचे असणारे हे संमेलन त्या वेळी तब्बल चार दिवस चालले असून, सुमारे दीड ते दोन लाख भाविक व साहित्यप्रेमींनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले होते, तर प्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके या संमेलनाच्या अध्यक्षा आणि उल्हास दादा पवार हे कार्याध्यक्ष होते. या ऐतिहासिक संमेलनाला संपूर्ण मंगेशकर कुटुंबियांसह डॉ. के. यू. शिवराम कारंथ, सुभाष मुखोपाध्याय, यू. आर. अनंतमूर्ती आणि डॉ. सीताकांत महापात्रा यांसारखे अनेक ज्ञानपीठ पुरस्कारविजेते दिग्गज साहित्यिक उपस्थित होते, तसेच संमेलनात २०० ग्रंथदालने उभारण्यात आली होती. याच ऐतिहासिक आठवणींना पुनश्च एकदा उजाळा देण्यासाठी आणि संत साहित्याचा विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी या नांदी संमेलनाचे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  #Sri Ganesh birth ceremony : 'दगडूशेठ' गणपती मंदिरात मंगल स्वरांच्या नामघोषात गणेशजन्म सोहळा संपन्न

दिवसभर चालणाऱ्या या संमेलनाची सुरुवात सकाळी ९ वाजता श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरापासून निघणाऱ्या भव्य ग्रंथदिंडीने होईल. या ग्रंथदिंडीमध्ये विद्यार्थी, शिक्षक, वारकरी आणि भजनी मंडळी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ही दिंडी फुटवाले धर्मशाळेपर्यंत पोहोचेल. त्यानंतर सकाळी सव्वादहा वाजता संमेलनाचा सोहळा अधिकृतपणे उद्घाटनाने सुरू होईल. १९९६ च्या संमेलनात लता दीदींच्या हस्ते उद्घाटन झाले असल्यामुळे, त्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी १९९६ च्या संमेलनाचे कार्याध्यक्ष उल्हास दादा पवार हेच विराजमान असणार आहेत. या प्रसंगी एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, डॉ. श्रीपाल सबनीस, योगेश सोमण, प्रशांत कुराडे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ह.भ.प. भावार्थ देखणे आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाहक सुनील महाजन  हे  मान्यवर व्यासपीठावर उपस्थित राहतील.

अधिक वाचा  मराठा आणि ओबीसी आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहण्याचे शरद पवारांनी सांगितले हे कारण

उद्घाटन सोहळ्यानंतर दुपारी १२ वाजता एक विशेष प्रात्यक्षिक म्हणून सव्वा तासाच्या चक्री भजनाचे आयोजन करण्यात आले आहे. ह.भ.प. श्री गुरु बाबा महाराज आवसेकर (पीठाधिपती श्रीनाथ संस्थान) आणि त्यांची भजनी मंडळी हे चक्री भजन सादर करतील. यानंतर दुपारच्या सत्रात ‘तीर्थक्षेत्राचे ज्ञानतीर्थ क्षेत्रात परिवर्तन घडवण्यासाठी आजच्या पिढीतील संत कीर्तनकार, प्रवचनकार यांचे अपेक्षित योगदान’ या विषयावर विशेष विचारमंथन व परिसंवाद आयोजित केला गेला आहे. या परिसंवादाचे सूत्रसंचालन डॉ. संजय उपाध्ये करणार असून, त्यामध्ये ह.भ.प. श्री यशोधन महाराज साखरे, ह.भ.प. श्री बापू महाराज मोरे आणि श्री सचिन परब हे तज्ज्ञ वक्ते सहभागी होऊन विचार मांडतील.

या परिसंवादामधून संत साहित्याचा आधुनिक शिक्षण पद्धतीत कसा समावेश करता येईल आणि संत विचारांना विज्ञानाची जोड कशी देता येईल यावर सखोल चर्चा केली जाणार आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर आणि डॉ. विश्वनाथ कराड यांनी मांडलेल्या ‘तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे’ या संकल्पनेचा पुनरुच्चार करताना संत साहित्याकडे केवळ अंधश्रद्धेने न बघता त्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेण्यावर भर दिला जाईल. कॉपरनिकसच्या २५० वर्षे आधी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत सूर्य स्थिर असून पृथ्वी व इतर ग्रह फिरतात या भौतिकशास्त्राच्या नियमाचे वर्णन ओव्यातून केले आहे, तसेच संत तुकारामांच्या अभंगांमध्ये मानवी मानसशास्त्राचे सखोल विज्ञान आढळते. या सर्व ज्ञानसंपदांचा अंतर्भूत शालेय व समकालीन शिक्षण प्रणालीत कसा करावा, यावर या सत्रात मार्गदर्शन केले जाईल असे प्रा. स्वाती चाटे यांनी सांगितले.

अधिक वाचा  एमआयटीच्या कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला ३ लाखाचा धनादेश

दुपारच्या उत्तरार्ध सत्रात संत साहित्याशी निगडित ‘ज्ञानदेवे रचिला पाया’ हा सव्वा तासाचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहे. १९९६ च्या संमेलनात लता मंगेशकर आणि शांताबाई शेळके या दोन्ही विदुषी उपस्थित होत्या. त्यांच्या आठवणींना अभिवादन म्हणून शांताबाईंनी लिहिलेल्या आणि लता दीदींनी गायलेल्या संतांच्या अभंग व ओव्यांवर आधारित हा कार्यक्रम होईल. यामध्ये डॉ. समीरा गुजर, डॉ. मधुरा वेलणकर, धनंजय भास्कर आणि संपदा माने व त्यांचे सहकारी आपली कला सादर करतील. याशिवाय संमेलन परिसरात संत साहित्याशी संबंधित ग्रंथांचे विशेष ग्रंथस्टॉल लावण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना व उपस्थितांना त्यातून ज्ञानार्जन करता येईल.

सायंकाळी ५ वाजता या संमेलनाचा भव्य समारोप सोहळा पार पडेल. या प्रसंगी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री  आशिष शेलार आणि श्रीनिवास पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच डॉ. सदानंद मोरे, राजेश पांडे, खेड विधानसभेचे आमदार बाबाजी काळे, प्राध्यापक राजन लाखे, प्रभाकर ओवळ आणि डॉ. पुरुषोत्तम काळे हे सन्माननीय अतिथी म्हणून सहभागी होतील.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाहक सुनील महाजन यांनी स्पष्ट केले की, पुण्यात होणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी कमिन्स कॉलेज, बारामती, नांदेड तसेच मराठवाडा व विदर्भातील विविध ठिकाणी अशी नांदी संमेलने आयोजित केली जात असून, आळंदीतील हे १७ वे नांदी संमेलन अत्यंत उत्साहात पार पडत आहे.

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love