पुणे(प्रतिनिधी)–देशातील अवजड वाहतूक क्षेत्राचे संपूर्ण विद्युतीकरण घडवून आणत प्रदूषणमुक्त हरित वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘एनर्जी इन मोशन’ (Energy in Motion) या कंपनीचा अत्याधुनिक ईव्ही ट्रक निर्मिती प्रकल्प मावळ तालुक्यातील आंबी (जि. पुणे) येथील आरएमके (RMK) इंडस्ट्रियल पार्क ३ मध्ये सज्ज झाला आहे. या भव्य प्रकल्पाचे उद्घाटन बुधवार, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या शुभहस्ते होणार आहे.
RMK समूहाविषयी माहिती देताना RMK समूहाचे चेअरमन श्री. रामदास काकडे म्हणाले, मावळ तालुक्यात चालू वर्षात ₹२,५०० कोटींची गुंतवणूक झाली असून ४,००० थेट रोजगार उपलब्ध झाले आहेत. या गुंतवणुकीत प्रामुख्याने एनर्जी इन मोशन (EIM), व्हिस्टिऑन (Visteon), एनडीएस (NDS), पीटीएल (PTL), अमेय फिनिशिंग सोल्यूशन्स, रिव्होल्टेक, के-नेस्ट, डब्ल्यू अँड डी (W&D), बोरटेक (Boretech) आणि मान अँड हमेल (Mann+Hummel) या कंपन्यांचा समावेश आहे.
RMK समूहामार्फत सात वर्षांत ₹१०,००० कोटींहून अधिक गुंतवणूक
मागील सात वर्षांत RMK समूहामार्फत मावळ तालुक्यात ₹१०,००० कोटींहून अधिक गुंतवणूक आणि १०,००० हून अधिक थेट रोजगार निर्माण झाले आहेत. याच काळात समूहाने १५,००० हून अधिक वृक्षांचे रोपण केले असून या उद्योगांसाठी ११.२ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारले आहेत. तळेगाव एमआयडीसीतील एकूण रोजगारांपैकी सुमारे ३० ते ४० टक्के रोजगार RMK समूहामुळे निर्माण झाले आहेत असे काकडे यांनी सांगितले.
परराज्यात जाणारे उद्योग मावळमध्ये
परराज्यात जाणारे उद्योग मावळमध्ये आणण्यासाठी RMK समूह ओळखला जातो. मावळमध्ये येणाऱ्या उद्योगांना सर्व आवश्यक सुविधा जलद गतीने उपलब्ध करून देणे, हे समूहाचे वैशिष्ट्य आहे. २०२४ मध्ये RMK इंडस्ट्रियल पार्कमध्ये ह्युंदाईच्या वेंडर कंपन्यांसाठी केलेली उभारणी हा या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. RMK मार्फत इटली, फ्रान्स, जपान, अमेरिका, जर्मनी, दक्षिण कोरिया, तैवान आदी देशांतील कंपन्यांनी मावळमध्ये गुंतवणूक केली असून, त्यामुळे मावळ तालुका आंतरराष्ट्रीय उद्योगजगताच्या नजरेत ठळकपणे आला आहे असे काकडे यांनी नमूद केले.
















