“मला या दोन्ही गुन्ह्यांचा अभिमान!” स्वतःवर गुन्हा दाखल झाल्यानंतर अमित ठाकरेंची आक्रमक प्रतिक्रिया

अमित ठाकरे शासकीय तंत्रनिकेतन गुन्हा अभिमान
अमित ठाकरे शासकीय तंत्रनिकेतन गुन्हा अभिमान

पुणे(प्रतिनिधी)–पुण्याच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील आंदोलनानंतर आपल्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक आणि रोखठोक भूमिका घेतली आहे. “माझ्यावर याआधी नवी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान राखण्यासाठी गुन्हा दाखल झाला होता आणि हा दुसरा गुन्हासुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानासाठीच दाखल झाला आहे; त्यामुळे मला या दोन्ही गुन्ह्यांचा सार्थ अभिमान आहे,” असे प्रतिपादन अमित ठाकरे यांनी सोमवारी केले.

विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांवर पुण्यात काढण्यात आलेल्या त्यांच्या शैक्षणिक दौऱ्यादरम्यान शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) महाविद्यालयाच्या प्राचार्यांना धमकावणे, कार्यालयात विनापरवानगी प्रवेश करणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो जबरदस्तीने हटवल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह २० ते २५ मनसे कार्यकर्त्यांवर चतुर्श्रंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी हे थेट आव्हान दिले आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात शासकीय तंत्रनिकेतन महाविद्याلयातून झाली, जिथे अमित ठाकरे हे कार्यकर्त्यांच्या मोठ्या समूहाला घेऊन प्राचार्य राजेंद्र पाटील यांच्या दालनात पोहोचले होते. विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील निकृष्ट दर्जाच्या जेवणाची तक्रार केल्याने, मनसे कार्यकर्त्यांनी त्याचा थेट पुरावा म्हणून मेसमधील सडलेल्या कांद्यांचा ट्रे प्राचार्यांच्या टेबलावर आदळला. याच दरम्यान प्राचार्य दालनात लावण्यात आलेल्या फोटोंवरून मोठा वाद निर्माण झाला. भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो शेजारी-शेजारी एकाच रांगेत लावल्याचे पाहून कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. प्राचार्यांनी हे फोटो शासकीय नियमानुसार आणि पुरेशा अंतरावर लावल्याचे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी प्राचार्यांच्या खुर्चीवर चढून पंतप्रधानांचा फोटो तिथून काढून टाकला आणि जोरदार घोषणाबाजी केली. हे कृत्य पूर्णपणे बेकायदेशीर असून शासकीय कामकाजात जबरदस्तीने अडथळा आणल्याचे सांगत प्राचार्यांनी पोलिसांत धाव घेतली. यानंतर पोलिसांनी अनलॉफुल असेंब्ली, क्रिमिनल ट्रेसपास आणि धमकी दिल्याचे कलम लावून गुन्हा नोंदवला, तर महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी अवघ्या १० मिनिटांत पंतप्रधानांचा फोटो पुन्हा पूर्ववत जागी लावला.

अधिक वाचा  पुणे मावळ: पाटण गावात दरड कोसळून भीषण दुर्घटना; तिकोणे कुटुंबातील तिघांचा मृत्यू

अमित ठाकरे यांनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील आणि मेसमधील विद्यार्थ्यांच्या भयानक परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी केलेल्या आरोपानुसार, होस्टेलच्या जेवणात अळ्या आणि पिण्याच्या पाण्यात किडे मिळतात, तर तिथल्या स्वयंपाकघरात दोन दिवसांपूर्वी उंदीर फिरत होते, जे केवळ ते येणार म्हणून साफ करण्यात आले. सरकारकडून वसतिगृहासाठी मोठा निधी येत असताना आणि विद्यार्थी स्वतःचे पैसे भरत असतानाही त्यांना अशा नरकयातना भोगाव्या लागत आहेत. इतकेच नव्हे, तर होस्टेलच्या खोलीतील खिडक्यांच्या काचा फुटलेल्या असून, तिथे केवळ कार्डबोर्ड लावून खिडक्या झाकण्यात आल्या आहेत, जे अत्यंत संतापजनक आहे. दोन वर्षांपासून तिथे असलेले प्राचार्य विद्यार्थ्यांची अशी दुरवस्था करून ठेवत असल्याचा आरोप करत, अमित ठाकरेंनी त्यांच्या कारभारावर कडाडून टीका केली.

अधिक वाचा  संस्कृत ही भारतीय ज्ञानपरंपरेचे संवहन करणारी ज्ञानभाषा - प्रा. डॉ. दिनेश रसाळ

चंद्रकांत पाटील यांची तातडीने शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाला भेट

या संपूर्ण गोंधळानंतर आणि अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तातडीने रात्रीच्या वेळी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाला भेट दिली आणि तिथल्या प्रलंबित कामांचा आढावा घेतला. त्यांनी तिथल्या टॉयलेट आणि बाथरूमच्या रखडलेल्या कामाबाबत कंत्राटदाराला आणि साईट इंजिनिअरला तीव्र शब्दांत जाब विचारला. कामाची मुदत संपूनही उशीर झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करत चंद्रकांत पाटलांनी कंत्राटदाराला ताकीद दिली की, यापुढे कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही, गरज पडल्यास अतिरिक्त मजूर लावून हे काम तातडीने पूर्ण करा. यावर टोला लगावताना अमित ठाकरे म्हणाले की, चंद्रकांत दादा केवळ फोटो काढल्यावरच कॉलेजमध्ये जात असतील तर विचार करायला हवा. तरीही त्यांनी तिथे जाऊन विद्यार्थ्यांची परिस्थिती जाणून घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानत, चंद्रकांत दादा आता तिथल्या मेस आणि कॅनटीनचा प्रश्नही मार्गी लावतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून अमित ठाकरे पुण्यातच असल्याने त्यांना पुढील चौकशीसाठी लवकरच बोलावले जाईल, असे स्पष्ट केले आहे.

अधिक वाचा  पुणे: समग्र शिक्षा अभियान सामाजिक अंकेक्षणात मोठा गोंधळ; प्रशासकीय नियोजनाअभावी मुख्याध्यापकांना मनस्ताप

वाडिया कॉलेजलाही भेट

शैक्षणिक दौऱ्यादरम्यान अमित ठाकरेंनी पुण्याच्या नामांकित वाडिया कॉलेजलाही भेट दिली, जिथे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा आणखी एक गंभीर प्रश्न समोर आला. कॉलेजच्या अवघ्या १०० मीटरच्या आत सिगरेट, गुटख्यासोबतच गांजासारखे अमली पदार्थ उघडपणे विकणाऱ्या तब्बल सात टपऱ्या थाटण्यात आल्या होत्या. यामुळे विद्यार्थिनींना जवळच्या झेरॉक्सच्या दुकानात जाणेही अशक्य झाले होते. कॉलेजच्या ट्रस्टींनी वर्षभरापासून पोलिसांना वारंवार पत्रे देऊनही काहीच कारवाई झाली नसल्याने मनसे कार्यकर्त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्या टपऱ्या बंद पाडल्या आणि पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडले. याच वेळी महाविद्यालयात येणाऱ्या मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमियोंना कडक इशारा देताना अमित ठाकरे म्हणाले की, “अशा मुलांची नावे आधी आमच्याकडे द्या, आम्ही पहिल्यांदा पोलिसांनकडे जाऊ, परंतु तिथून न्याय मिळाला नाही तर मग आमच्या पद्धतीने काय करायचे हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे”.

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love