पुणे(प्रतिनिधी)–प्रोक्टॉलॉजी आणि अॅनोरेक्टल केअर क्षेत्रातील नामांकित आणि विशेष संस्था ‘हिलिंग हँड्स क्लिनिक’ने पुढील दोन वर्षांत भारतभरातील आपल्या केंद्रांची संख्या ४० वरून १०० पर्यंत वाढवण्याची मोठी योजना आखली आहे. संपूर्ण नेटवर्कमध्ये सातत्यपूर्ण आणि उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा देण्यासाठी क्लिनिकल, तंत्रज्ञान आणि ऑपरेशनल यंत्रणा बळकट करताना विशेष उपचार रुग्णांच्या जवळ नेणे हा या देशव्यापी विस्ताराचा मुख्य उद्देश असल्याचे क्लिनिकचे संस्थापक डॉ. अश्विन पोरवाल यांनी सांगितले.
एल कॅटरटनच्या ३० दशलक्ष डॉलर्स गुंतवणुकीच्या भक्कम पाठबळाने होणारा हा विस्तार प्रामुख्याने पहिल्या आणि दुसऱ्या श्रेणीतील शहरांवर लक्ष केंद्रित करेल आणि क्लिनिकला एक व्यापक विशेष आरोग्यसेवा प्लॅटफॉर्म म्हणून विकसित करेल. या ६० नवीन केंद्रांमुळे संस्थेची उपस्थिती १०० हून अधिक नवीन पिन कोड्समध्ये विस्तारणार आहे.
पुण्यातील एका छोट्या बाह्यरुग्ण (ओपीडी) केंद्रापासून सुरू झालेल्या या क्लिनिकचे आज ४० केंद्रांचे जाळे असून ८०० पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. हे क्लिनिक सध्या दरवर्षी ५०,००० नवीन रुग्णांवर उपचार करते. याच विस्ताराचा भाग म्हणून पुढील १८ महिन्यांत पुण्यात एक सुपर-स्पेशलिटी प्रोक्टॉलॉजी हॉस्पिटल सुरू केले जाणार आहे, जे गुंतागुंतीच्या आजारांवर प्रगत उपचार, क्लिनिकल संशोधन आणि सर्जन प्रशिक्षणाला पाठबळ देईल.
क्लिनिकचे संस्थापक डॉ. अश्विन पोरवाल म्हणाले, प्रोक्टॉलॉजीला इतर वैद्यकीय क्षेत्रांप्रमाणे सखोलता व वैज्ञानिक दृष्टिकोन मिळायला हवा. त्यांनी गुंतागुंतीच्या भगंदरासाठी (फिस्ट्युला) ‘डिस्टल लेझर प्रॉक्सिमल लायगेशन’ (डीएलपीएल), मूळव्याधीसाठी टप्प्यानुसार दिलेला दृष्टिकोन, पायलोनिडल सायनससाठी लेझर पायलोनिडॉटॉमी आणि रेक्टल प्रोलॅप्सच्या नवीन तंत्रज्ञानावर भर दिला आहे. सह-संस्थापक आणि सीईओ रोशन पोरवाल म्हणाले की, रुग्णाच्या पिन कोडवर उपचारांचा दर्जा अवलंबून नसेल .











