‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार २०२६’ जाहीर : श्रीधर लोणी,अंजली खमितकर, मयुरेश प्रभुणे आणि मोनेश शेलार यांचा सन्मान

देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार २०२६ (Devarshi Narad Journalism Awards 2026)
देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार २०२६ (Devarshi Narad Journalism Awards 2026)

पुणे(प्रतिनिधी)–विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी दरवर्षी देण्यात येणारे ‘आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार २०२६’ जाहीर झाले आहेत. यंदा ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पुणे आवृत्तीचे संपादक श्रीधर लोणी यांना ‘ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार’, तर ‘सकाळ’चे विशेष बातमीदार मयुरेश प्रभुणे आणि ‘प्रभात’च्या वरिष्ठ बातमीदार अंजली खमितकर यांना ‘आश्वासक पत्रकारिता पुरस्कार’ जाहीर झाला आहे. तसेच सोशल मीडियाच्या प्रभावी वापरासाठी मोनेश शेलार यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी आणि ‘डीईएस’च्या नियामक मंडळाचे कार्यवाह आनंद काटीकर यांनी पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली. यावेळी डीईएसचे नियामक मंडळाचे सदस्य मिलिंद कांबळे उपस्थित होते.

अधिक वाचा  …ही देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक : मुरलीधर मोहोळ

येत्या शनिवारी (ता. २२) सकाळी ११ वाजता फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडेल. दिल्लीतील लेखक, बस्तरचे रहिवासी तथा नक्षलवादाचे अभ्यासक राजीव रंजन प्रसाद यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. या सोहळ्यात राजीव रंजन प्रसाद हे ‘नक्षलवादी चळवळ- काल आणि आज’ या विषयावर विशेष व्याख्यान देणार आहेत.

विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी सांगितले की, देवर्षी नारद यांच्या नावाने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे हे १४ वे वर्ष आहे. पत्रकारितेतील सातत्यपूर्ण विश्लेषणात्मक लिखाण आणि व्यासंगी अभ्यासक म्हणून श्रीधर लोणी यांना ‘ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार’ (३१ हजार रुपये रोख आणि देवर्षी नारदांची मूर्ती) देऊन गौरविण्यात येणार आहे. विज्ञान, हवामान आणि पर्यावरण पत्रकारितेतील अग्रगण्य योगदानाबद्दल मयुरेश प्रभुणे, तर धडाडीच्या बातमीदारीबद्दल अंजली खमितकर यांना ‘आश्वासक पत्रकारिता पुरस्कार’ (प्रत्येकी २१ हजार रुपये रोख आणि मूर्ती) प्रदान करण्यात येईल. तसेच, समाजमाध्यमांवर प्रेक्षकांना भावणारी आणि रुचणारी तथ्यात्मक मांडणी केल्याबद्दल मोनेश शेलार यांचा गौरव (२१ हजार रुपये रोख आणि मूर्ती) करण्यात येणार आहे.

अधिक वाचा  Pune Municipal Corporation Election : पुणे मनपा आरक्षण सोडत जाहीर : दिग्गज नेत्यांचे 'राजकीय गणित' बदलले

पत्रकार परिषदेत आनंद काटीकर यांनी ‘डीईएस’ पुणे विद्यापीठाच्या उपक्रमांची माहिती दिली. सध्या माध्यम क्षेत्रात केवळ बातमीदारीच नव्हे, तर प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी आवश्यक असलेल्या फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, वेब डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग अशा विविध अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचे त्यांनी नमूद केले. या पुरस्कार वितरण सोहळ्यास माध्यम क्षेत्रातील प्रतिनिधींसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love